सलग १८ तास वीजपुरवठा खंडित
ठाणे आणि भिवंडीच्या वेशीवर वसलेल्या कशेळी, काल्हेर भागात सलग १८ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील रहिवाशांचे हाल झाले. गेल्या काही महिन्यांपासून या भागाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. असे असताना सोमवारी रात्री अचानक वीज गेल्याने हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. मंगळवारी दुपारी या परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.
ठाणे जिल्हय़ातील भिवंडी तालुक्यामध्ये कशेळी व काल्हेर हे परिसर येत असून येथे मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. या दोन्ही परिसरांना टॉरेंट पॉवरच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी हैराण असतानाच सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे परिसरातील वीजसेवा खंडित झाली. ऐन रात्रीच्या वेळेस बत्ती गुल झाल्याने परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत होता. वीजपुरवठा दुपापर्यंत पूवर्वत झाला नव्हता. यासंदर्भात टॉरेंट पॉवरचे अधिकारी गोविंद राठोड यांच्याशी तसेच अन्य अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही अधिकाऱ्याकडून यासंबंधी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.