नीलेश पानमंद/ आशीष धनगर

कळवा, मुंब्रा, दिव्यात वारंवार वीजपुरवठा खंडित; ‘यूपीएस’ही निष्प्रभ

ठाणे महापालिका क्षेत्रातील शहरांत बसवण्यात आलेले १३०० सीसीटीव्ही कॅमेरे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे कुचकामी ठरत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण बंद पडू नये, यासाठी ‘यूपीएस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यातून कॅमेरे केवळ अर्धा तास चालू शकत आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा या भागांत कॅमेऱ्यांत होणाऱ्या चित्रीकरणात खंड पडण्याच्या घटना जास्त आहेत.

ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था चांगल्याप्रकारे राखली जावी, या उद्देशातून प्रशासनाने शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार प्रभाग सुधारणा निधीतून आणि वायफाय योजनेतून शहरभर सुमारे १६०० कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यापैकी १३०० कॅमेरे आतापर्यंत शहराच्या विविध भागांत बसविण्यात आले आहेत. रस्त्यालगतच्या वीजेच्या खांबांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारातही परिसरातील घटनेचे चित्रीकरण होईल, अशाप्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. शहराच्या विविध भागांत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांना विद्युत जोडणी देण्यात आली आहे. या भागाचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतरही कॅमेऱ्यातील चित्रीकरण सुरू राहावे यासाठी यूपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यूपीएसची यंत्रणा एका खांबावर बसविण्यात आली असून त्याद्वारे तीन ते चार कॅमेरे जोडण्यात आले आहेत. परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला तर कॅमेऱ्यांना यूपीएसद्वारे वीजपुरवठा होतो. यूपीएस यंत्रणेची क्षमता केवळ अर्धा तास वीजपुरवठा करण्याची आहे. त्यामुळे अध्र्या तासांपेक्षा जास्त वेळ यूपीएस यंत्रणेमधून कॅमेऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे अध्र्या तासानंतर वीजपुरवठा खंडित होऊन कॅमेऱ्यांचे चित्रीकरण बंद पडते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा तसेच दिवा भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात आणि अनेकदा दोन ते तीन तास वीज गायब असते. अशा वेळी ‘यूपीएस’चाही उपयोग होत नाही. तसेच जास्त क्षमतेचे यूपीएस विजेच्या खांबांवर बसवणे शक्य नाही. सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे असल्यामुळे जनरेटरची व्यवस्थाही करणे शक्य नाही. त्यामुळे अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित झाला, तर परिसरातील कॅमेरे कसे सुरू ठेवायचे असा पेच प्रशासनाला पडला आहे.

मुंबई तसेच अन्य शहरांत जितक्या क्षमतेची यूपीएस यंत्रणा बसविली आहे, तितक्याच क्षमतेची यूपीएस यंत्रणा ठाण्यात बसविली आहे. यूपीएस यंत्रणेद्वारे होणारा वीजपुरवठाही खंडित झाला, तर महावितरण विभागाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येतो.

– सुनील पोटे, उपनगर अभिंयता (विद्युत), ठाणे महापालिका.