दहा तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

 

ठाणे : वागळे इस्टेट भागात दाट लोकवस्ती असलेल्या यशोधननगर तसेच सावरकरनगरमधील काही भागांत गुरुवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल दहा तासांनंतर सुरू झाला. विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दहा तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही परिसरात विजेचा लपंडाव सुरूच होता. यामुळे इमारतीचे पाणीनियोजन कोलमडल्याने नागरिकांना विजेसोबतच पाणी समस्येला सामोरे जावे लागले.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागात सावकरनगर आणि यशोधननगर आहे. अतिशय दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे. या भागातील काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरुस्तीसाठी २४ तास लागणार असल्याचे संदेश महावितरणने नागरिकांना मोबाइलवर पाठविले. २४ तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, रात्री २ वाजता परिसराचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, दहा तास वीजपुरवठा खंडित असल्यामुळे इमारतींमधील पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विद्युत मोटार बंद होत्या. त्यामुळे इमारतींमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन बिघडले आणि त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचाही सामना करावा लागला. असे असतानाच शुक्रवारी सकाळी ६ वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी ९.३० वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. तांत्रिक कामांमुळे हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, अशी माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी १ वाजता हा वीजपुरवठा सुरळीत झाला. या विजेच्या लपंडावामुळे महावितरणच्या या कारभाराविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.