ठाणे महापालिकेने वीज बिल न भरल्याने पुरवठा खंडित; वाचक, अभ्यासकांना फटका
ठाणे शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राच्य विद्या संस्थेच्या इमारतीचा विद्युतपुरवठा मंगळवारी महावितरण कंपनीने खंडित केला. या वास्तूचे विजेचे बिल ठाणे महापालिका भरत असते. मात्र, महापालिका प्रशासनाने विद्युतदेयक भरणा बंद केल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली. त्याचा फटका वाचक आणि अभ्यासकांना बसू लागला आहे.
ठाणे शहरामध्ये १९८५ पासून प्राच्य विद्या अभ्यास संस्था कार्यरत असून या ठिकाणी ४० हजाराहून अधिक दुर्मीळ पुस्तके, तीन हजार संस्कृत हस्तलिखिते आणि दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू यांचे जतन करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातीलच नव्हे तर, परदेशातील अभ्यासक आणि संशोधक येथे भेट देतात. या संस्थेचे काम आणि महत्त्व पाहून तात्कालीन महापालिका आयुक्त गोविंद स्वरूप यांनी महापालिकेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती प्रभाग समिती कार्यालयाचा पहिला मजला संस्थेला उपलब्ध करून दिला होता. मात्र, २०११मध्ये महापालिका प्रशासनाने हे ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय नौपाडा येथून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या हजुरी येथील पद्मभूषण कै. श्रीनिवास खळे वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. मात्र तेव्हापासून संस्थेसमोर समस्यांचा डोंगर उभा राहू लागला आहे. या संग्रहालयाचे विजेचे बिल ठाणे महापालिकेमार्फत भरण्यात येते. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने वीज बिलाचा भरणा बंद केला आहे. वीज बिलाचे सुमारे लाखभर रुपये थकल्याने अखेर महावितरण कंपनीने या इमारतीचा वीजपुरवठा मंगळवारी खंडित केला. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या वाचक आणि अभ्यासकांना मोठा फटका बसू लागला आहे.

नव्या इमारतीतही हाल कायम
हजुरी येथील पद्मभूषण कै. श्रीनिवास खळे वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत स्थलांतर झाल्यापासून प्राच्य विद्या संस्थेच्या अडचणी सुरू झाल्या आहेत. शहरापासून दूरच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या वाचक, अभ्यासकांना वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यातच तीन मजल्याच्या या इमारतीमध्ये संग्रहालयास आवश्यक सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली नसल्याने त्याचा संस्थेला दोन वर्षे त्रास सहन करावा लागला. त्यानंतर संस्थेने शहरातील नागरिक आणि हितचिंतकांच्या मदतीने सुमारे आठ लाख किमतीची पुस्तकांची कपाटे आणून संस्थेचे काम सुरू केले. परंतु, पालिकेकडून या संस्थेकडे होणारे दुर्लक्ष आजही कायम आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

धुळे, पुण्यानंतर अत्यंत दुर्मीळ असे वस्तुसंग्रहालय ठाण्यात असून त्यामध्ये अनेक मान्यवरांनी या संग्रहालयासाठी हातभार लावला असून दुर्मीळ वस्तू खुल्या करून दिल्या. ठाणे महापालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली हे चांगले असले, तरी त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी मात्र संस्थेला संघर्ष करावा लागत आहे. संस्थेने महापालिकेकडे कोणत्याही वास्तूची मालकी नव्हे, तर मूलभूत सुविधांची मागणी केली आहे. त्याही मिळत नसल्याने संस्थेच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. महापालिकेच्या या वास्तूचा वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच आवश्यक सुविधांचा पुरवठा करून महापालिकेने संस्थेच्या अडचणी दूर करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पुढाकार घेऊन हा वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– डॉ. विजय बेडेकर, अध्यक्ष प्राच्य विद्या अभ्यास संस्था, ठाणे

तांत्रिक अडचणींमुळे वीजदेयकाची समस्या निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष दिले आहे. लवकरच यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी दूर करुन विजेचा पुरवठा सुरळीत केला जाईल.
– संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका