भिवंडीत मोठा राजकीय भूकंप झाला असून महापालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा आणि बंडखोर काँग्रेसच्या मदतीने महापौरपदी अवघे चार नगरसेवक असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. ४७ नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसची भिवंडी महापालिकेत एकहाती सत्ता होती. मोदी लाट असतानाही भिवंडीत मात्र काँग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवलं होतं. पण बंडखोरीमुळे एकहाती सत्तेलाही सुरुंग लागला आहे.

प्रतिभा पाटिल यांना एकूण ४९ मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना ४१ मतं मिळाली. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना व्हीपदेखील जारी केला होता. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांचा विजय झाला आहे.

दरम्यान उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. इमरानवल्ली यांना एकूण ४९ मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना ४१ मतं मिळाली. शिवसेनेचे फक्त १२ नगरसेवक असतानाही राज्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे ४१ चा आकडा गाठणं त्यांना शक्य झालं.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस – ४७
शिवसेना – १२
भाजप – २०
कोणार्क विकास आघाडी – ४
समाजवादी पार्टी – २
आरपीआय (एकतावादी)- ४
अपक्ष – १