X
X

कोळंबी प्रकल्पाचा वाद पेटला!

READ IN APP

वसई पश्चिमेच्या भुईगाव येथील ६५ एकर जागेवर कोळंबी प्रकल्प उभा राहत आहे.

भाजप विरुद्ध आदिवासी संघर्ष; आदिवासींना विस्थापित होण्याची भीती

भुईगाव येथील कोळंबी प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झालीे आहे. तहसीलदारांनी येथील बंधाऱ्याविरोधात कारवाई करताच बचावासाठी भाजप पुढे आल्याने आदिवासी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कोळंबी प्रकल्प निर्माण होण्यापूर्वीच त्याचा वाद पेटला आहे.

वसई पश्चिमेच्या भुईगाव येथील ६५ एकर जागेवर कोळंबी प्रकल्प उभा राहत आहे. त्यासाठी मातीभराव करून जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत आहे, तसेच येथील तिवरांच्या झाडांच्या बेकायदा कत्तली करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासींनी केला आहे. या ठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात खाडी किनारील पाच आदिवासी पाडे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गिरीज नवपाडा येथील आदिवासी पाडे अनेक वर्षांपासून येथे असून अडीचशे आदिवासींची घरे तेथे आहेत. या प्रकल्पावर कारवाई करून बेकायदा बांध तोडून टाकण्याचीे मागणी आदिवासी एकता परिषदेने केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी बांध बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नैसर्गिक पाण्याचे स्रोत अडविणारे बंधारे तोडून टाकले होते.

त्यामुळे आदिवासी विरोधात भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन आदिवासींचीे घरे बेकायदा असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही आदिवासींचीे घरे नदीच्या पात्रात असून ती बेकायदा आहेत, असे त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रानगाव भुईगाव खारभूमी योजनेमध्ये ११ गाळ्यांपैकी ६ गाळ्यांची झडपे तुटली आहेत. त्यामुळे या गाळ्यांमधून समुद्राचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान होईल म्हणून बंधारा बांधल्याचा दावा केला. तहसीलदारांनी हे काम थांबवून फेरपाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे स्थानिक आदिवासींसमोर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. जितेंद्र मेहेर यांच्या कंपनीने बांध बांधला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मेहेर हे भाजपचे पदाधिकारी असल्याने त्यांना वाचविण्यासाठी पक्ष पुढे आल्याचा आरोप स्थानिक आदिवासी विनायक कवाटे यांनी केला े.तसेच बंधाऱ्यामुळे आमची घरे पाण्याखाली जाणार आहेत, असे ते म्हणाले. कोळंबी प्रकल्पासाठी झालेला मातीभराव आणि तोडलेलीे तिवरांची झाडे शासन आणि भाजप नेत्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

आम्ही पाण्याचे नैसर्गिक स्रोत अडविणाऱ्यांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल केले होते. आता पाण्याचे नैसर्गिक स्रोत अडविणाऱ्या बंधाऱ्यावर कारवाई केली आहे. पुढील कारवाई फेरतपासणीनंतर करण्यात येईल.

– गजेंद्र पाटोळे, तहसीलदार, वसई

कोळंबीे प्रकल्प राबविणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करता माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आमच्या शेतीला खाडीच्या पाण्याचे नुकसान होऊ नये म्हणून हा बांध बांधण्यात आला होता. यामागे राजकीय षड्यंत्र आहे.

 – जितेंद्र मेहेर, भाजप पालघर जिल्हा मच्छीमार आघाडी प्रमुख

आदिवासी समाजाच्या कित्येक पिढय़ा येथे गेल्या. त्यांना विस्थापित करण्याचे हे षड्यंत्र आहे. सलील अंकोला या क्रिकेटपटूचा कोळंबी प्रकल्प आम्ही आंदोलन करून बंद पाडला होता. स्थानिकांना विस्थापित करणाऱ्या या कोळंबी प्रकल्पाची गरज काय? गिरीज आणि परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होणार आहे.

– सायमन मार्टिन, सामाजिक कार्यकर्ते

23
X