कल्याण, डोंबिवली महापालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने शहरातील कोविड रुग्णालयांनी स्थानिक नागरिकांनाच रुग्णसेवेसाठी प्राधान्य द्यावे असा अजब फतवा प्रशासनाने काढला आहे. एखादा रुग्ण अतिशय गंभीर असेल तर अशा प्रकरणांचा अपवाद करता येईल. अन्यथा रुग्णालयातील खाटा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांसाठीच आरक्षित असाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खासगी करोना रुग्णालयांमध्ये महापालिका हद्दीबाहेरील रुग्णांवर उपचार केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीबाहेर असलेल्या अर्धनागरी क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणावर रुग्ण कल्याण डोंबिवलीतील कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होत असतात. ठाणे महापालिकेनेही मध्यंतरी अशाच स्वरूपाचा निर्णय घेतल्याने शहरात लागूनच असलेल्या गावांमधील आणि विशेषत अर्धनागरी क्षेत्रातील कोविड रुग्णांनी नेमके कोठे दाखल व्हायचे असा सवाल उपस्थित झाला होता. ठाणे शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण दाखल होत आहेत. असे असताना ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेनेही रुग्ण दाखल करण्यासाठी स्थानिकांच्या आरक्षणाचा आग्रह धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांना वेळीच उपचारासाठी जागा उपलब्ध व्हावी या दृष्टीने खासगी, महापालिकेच्या रुग्णालयांनी नियोजन करणे आवश्यक आहे. रुग्णालयात बाहेरील रुग्ण येऊन उपचार घेऊ लागले तर पालिका हद्दीतील रुग्णांना उपचार कसे द्यायचे असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांनी हा आदेश काढताना उपस्थित केला आहे. त्यामुळे पालिका हद्दीबाहेरील रुग्ण कडोंमपा हद्दीत उपचारासाठी आला तर त्याची परिस्थिती पाहून त्याला दाखल करण्याचा विचार करावा. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय पालिका हद्दीबाहेरील एकही रुग्ण दाखल करून घेऊ नये. त्यांना त्यांच्या हद्दीतील रुग्णालयांत दाखल करण्याची सूचना स्थानिक रुग्णालय चालकांनी करावी, अशा सूचना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी खासगी रुग्णालय संचालकांना दिल्या आहेत.