जिल्हा रुग्णालयात सूतिकागृह एकीकडे, तर शस्त्रक्रिया विभाग दुसरीकडे

जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता आणि बेजबाबदार कारभारामुळे रुग्णांचे हाल होत असतानाच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांना सुरळीत प्रसूती करून घेण्यासाठी तिष्ठत राहावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीसाठी लेबर वॉर्ड असला तरी शस्त्रक्रिया करायची असल्यास (सिझरिंग) त्यांना जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर न्यावे लागते. या इमारतीत दोन लिफ्टची सोय असली तरी त्यापैकी एक लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंद आहे तर सध्या सुरू असलेली लिफ्टही डागडुजीअभावी  वारंवार बंद पडत असल्याने प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांच्या सुरक्षित प्रसूतीचा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

रुग्णालयाच्या आवारात प्रवेश केल्यावर एक आणि दोन क्रमांकाचे वॉर्ड असलेल्या इमारतीत तळ मजल्यावर महिलांच्या प्रसूतीसाठी दोन लेबर वॉर्ड होते. सध्या या वॉर्डपैकी एकच प्रसूतीगृह सुरू असून या ठिकाणी महिलांची प्रसूती करण्यात येते. अन्य लेबर वॉर्ड बंद करून त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लेबर वॉर्डची सोय करून देण्यात आली आहे. तळमजल्यावरील पूर्वीच्या लेबर वॉर्डच्या जागेत गोदाम तयार करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून प्रसूती करावी लागल्यास महिलांना स्ट्रेचरवरून जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाण्याचे दिव्य पार पाडावे लागते. लिफ्ट उपलब्ध असली तरी डागडुजी न केल्याने अनेकदा लिफ्ट मध्यावरच बंद पडते. त्यामुळे महिलांचे जीवही धोक्यात येऊ शकतो. ज्या ठिकाणी प्रसूतीगृह आहे, त्याच इमारतीत शस्त्रक्रिया विभाग असणे गरजेचे आहे. मात्र खोलीची उपलब्धता असूनही महिलांना प्रसूतीकाळात वेदनामय प्रवास करावा लागतो. अनेकदा रुग्णालयाचे कर्मचारी नसतात. अशावेळी सोबत असलेल्या नातेवाईकांनाच संबंधित रुग्ण महिलेला शस्त्रक्रिया विभागात घेऊन जावे लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पूर्वी जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत लेबर वॉर्ड होता. मात्र तिथे आता गोदाम कक्ष आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तात्काळ महिलांना शस्त्रक्रिया करायची असताना संबंधित इमारतीत सुविधा नाहीत. वास्तवात जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर पुरेशी जागा आहे. तिथे प्रशासनाच्या बैठकाही होतात. मात्र प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता रुग्णालय व्यवस्थापनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे.

भर पावसातही महिलांना रुग्णालय परिसरातून उघडय़ावर शस्त्रक्रिया विभागात घेऊन जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. या संदर्भात रुग्णालय अधीक्षक केम्पी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही.