ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांच्या परवाना शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नव्या दरपत्रकानुसार अगदी लहानात लहान रुग्णालयांचे परवाने शुल्क ५०० रुपयांनी, तर मोठय़ा रुग्णालयांसाठी पाच ते दहा लाखांपर्यंत शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडणार असली तरी वैद्यकीय व्यावसायिक परवाना शुल्काचा भार रुग्णांवर टाकण्याची भीती असल्याने प्रशासनाच्या प्रस्तावावर सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे साडेतीनशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. नियमानुसार खासगी रुग्णालयांची तसेच नवीन रुग्णालयाची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक असून अशा नोंदणीकृत रुग्णालयांकडून महापालिका प्रशासन दरवर्षी परवाना शुल्क घेत असते. त्यासाठी रुग्णालयातील खाटांच्या संख्येवर आधारित हे दरपत्रक तयार करण्यात येते. यंदा पालिकेने या परवाना शुल्कातून जादा उत्पन्न कमावण्याचा बेत आखला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार १०० खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या रुग्णालयांचे परवाना शुल्क दुप्पट करण्यात आले आहे.

सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर हे दर अमलात येतील. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये या प्रस्तावाविषयी भिन्न मतप्रवाह आहेत. मोठय़ा रुग्णालयांना परवाना शुल्कात वाढीचा प्रस्ताव योग्य असला तरी ५ ते ५० खाटांच्या मध्यम आणि लहान रुग्णालयांमधील परवाना शुल्कवाढीचे प्रमाण मोठे आहे, असे मत सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

प्रस्तावित दरपत्रक

खाट संख्या     जुने दर   नवे दर

१-५                 २५००     ३०००

६-१०               २५००     ५०००

११-१५             ३५००     ६०००

१६-२०              ६०००     ७०००

२१-२५              ११,००० २०,०००

२६-५०             ३५,०००   ५०,०००

५१ ते ७५          ६०,०००   १,००,०००

७६ ते १००        १,१५,०००  २,००,०००

१०१ ते १५०      २,५०,०००  ५,००,०००

१५१पासून पुढे… १०,००,०००