प्रवासी सेवेला सर्वाधिक प्राधान्य देणारा कायदा तयार करण्यात येणार आहे. त्याची आखणी करण्यात आली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी ही रिक्षाचालकांच्या हाती आहे. प्रवाशांना तात्काळ सेवा देणाऱ्या प्रीपेड रिक्षाचा प्रयोग राज्याच्या इतर प्रमुख शहरात राबवू, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी येथे केले.
कल्याणमध्ये प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ रावते यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, रिक्षाचालकांनी आपली वर्तणूक आणि सेवेत बदल करून आदर्शवत अशी प्रवासी सेवा प्रवाशांना द्यावी. चालक आणि प्रवासी यांच्या समन्वयातून रिक्षा व्यवसाय वाढणार आहे. यातून रिक्षाचालकांनी आदर्श चालक बनण्याचे प्रयत्न करावेत.
या वेळी आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन आयुक्त सोनिया सेठी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, नंदकुमार नाईक, कोकण विभाग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर उपस्थित होते.
कल्याण परिसरात मीटर रिक्षाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही; तसेच कल्याण परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांची खूप लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे प्रीपेड रिक्षा हा चांगला पर्याय नागरिकांना उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २२ रिक्षाचालकांचा या वेळी सत्कार करण्यात आला.