ठाणे शहरातील काही गैरप्रकारांमुळे रिक्षाप्रवास धोकादायक ठरू लागल्याने सुरक्षित प्रवासासाठी महिला आता ‘प्रीपेड रिक्षा’ योजनेचा पर्याय निवडू लागल्याचे महिनाभरातील आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या महिनाभरात या योजनेचा फायदा २१७ प्रवाशांनी घेतला असून त्यामध्ये सुमारे १४० महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे प्रीपेड रिक्षाचा प्रवास काहीसा महाग असला तरी महिला सुरक्षित प्रवासाकरिता त्याकडे वळू लागल्याचे उघड झाले आहे.
– ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम चांगली सेवा देण्यात अपयशी ठरत असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. खासगी बसगाडय़ा तसेच रिक्षांमधून प्रवासी प्रवास करू लागले आहेत. त्यापैकी खासगी बसगाडय़ा महामार्गावरच धावत असल्याने प्रवाशांना अंतर्गत वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रवाशांपुढे वाहतुकीचा दुसरा पर्याय खुला नसल्याने शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागली आहे. तसेच भाडे नाकारण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. रिक्षाचालकांकडून विविध मागण्यांसाठी अचानकपणे संप पुकारून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे ठाणेकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. असे असतानाच काही महिन्यांपूर्वी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींसोबत चालकाने गैरवर्तन केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी एका घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली होती. या घटनांमुळे रिक्षांचा प्रवास महिलांसाठी काहीसा धोकादायक ठरत असल्याचे उघड झाले .
– दरम्यान, महिलांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘प्रीपेड रिक्षा’ योजना सुरू केली. १ मेपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, प्रवासाचे दर काहीसे महाग असल्याने ही योजनेविषयी टीका झाली होती. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी ठरू शकेल, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. मात्र, महिनाभरातील आकडेवारी पाहता २१७ प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला असून हा आकडा प्रवाशी संख्येच्या तुलनेत काहीसा कमी आहे. असे असले तरी, या सुरक्षित प्रवासाकडे महिला वर्ग वळल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

गेल्या महिनाभरात प्रीपेड रिक्षा योजनेचा २१७ प्रवाशांनी लाभ घेतला असून त्यामध्ये १४० महिला प्रवाशांचा समावेश आहे. या योजनेमध्ये घोडबंदर, वसंतविहार तसेच अन्य लांब पल्ल्याच्या भागांना ८० टक्के प्रवाशांनी तर टेंभीनाका यासारख्या जवळपासच्या भागांना २० टक्के प्रवाशांनी पसंती दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
 हेमांगिनी पाटील, ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी