परिवहन विभागाच्या सर्वेक्षणानंतर निर्णय; महिनाभरात स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागांत सेवा

किशोर कोकणे, ठाणे</strong>

ढिसाळ नियोजनामुळे चार वर्षांपूर्वी बंद पडलेली प्रीपेड रिक्षा व टॅक्सी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. ठाणेकरांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सोय देणाऱ्या या सुविधेसाठी या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी सर्वेक्षण केले होते. त्याआधारे येत्या महिनाभरात ठाणे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात प्रीपेड रिक्षा-टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे.

ठाण्यात २०१५ मध्ये स्वप्नाली लाड या तरुणीला एका रिक्षाचालकाने घरी नेण्याच्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने रिक्षा नेल्यामुळे भेदरलेल्या स्वप्नालीने बचावासाठी धावत्या रिक्षातून उडी घेतली होती. या घटनेनंतर महिलावर्गाच्या सुरक्षित रिक्षाप्रवासाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ठाण्यात प्रीपेड रिक्षा चालविण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. या सेवेमुळे प्रवाशांना सुविधाही मिळेल तसेच सुरक्षेच्या आघाडीवर अधिक उपाय आखता येतील असा उद्देश आखण्यात आला होता. परिवहन विभागाने पुढाकार घेतल्याने काही काळ ही सेवा जोमात सुरू राहिली. त्यानंतरच्या काळात मात्र प्रीपेड सेवेसाठी आवश्यक असणारी संगणक सुविधा बंद असणे, त्या ठिकाणी कर्मचारी नसणे अशा कारणांमुळे ही सेवा ढेपाळली. विशेष म्हणजे, ही सेवा सुरू राहावी यासाठी सुरुवातीला पुढाकार घेणाऱ्या परिवहन विभागानेही याकडे कानाडोळा केला.

काही दिवसांपूर्वी विजू नाटेकर रिक्षा संघटनेने परिवहन प्रशासनाची याबाबत भेट घेतली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ही योजना पुन्हा कशी सुरू करता येईल याविषयी चर्चा सुरू होती. सोमवारी सकाळी प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि विजू नाटेकर रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक सर्वेक्षण झाले. या वेळी स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील जागेची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. तसेच प्रीपेड रिक्षा आणि टॅक्सीसाठी लागणारे कार्यालय कुठे असेल, प्रवासी वाहतूक कशी होईल याचा आराखडा तयार करण्यात आला. या प्रीपेड रिक्षा आणि टॅक्सीमुळे

मुजोर रिक्षाचालकांना आळा घालणे शक्य होणार असून महिलांनाही सुरक्षित प्रवास करता येणार आहे, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात ही सेवा पुन्हा सुरू करता येईल, असा दावा या विभागाने केला आहे. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाहतूक विभागाची मदत घेतली जाणार आहे.

योजना अशी..

ग्राहकाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचे पैसे त्याला स्थानकातील कार्यालयात भरायचे असतात. त्यानंतर कार्यालयातून प्रवाशाला एक पावती दिली जाईल. या पावतीवर रिक्षाचालकाचे नाव, मोबाइल क्रमांक, रिक्षाच्या पाटीचा क्रमांक असणार आहे.

प्रीपेड रिक्षा संदर्भात यापूर्वीच प्रस्ताव मंजूर झाला होता, मात्र या रिक्षा पुन्हा एकदा सुरू करण्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यानुसार आराखडे तयार करण्यात आले आहे. या रिक्षांमुळे प्रवाशांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांवर आळा बसणार आहे.

– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. 

प्रीपेड रिक्षा यापूर्वीच सुरू झाल्या होत्या, मात्र नादुरुस्त संगणक  तसेच कार्यालयात कर्मचारी मिळत नव्हते. लवकरच ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. त्याचे दरपत्रकही प्रादेशिक परिवहन विभागाकडून लवकरच तयार करण्यात येतील.

– सुरेंद्र पगारे, सरचिटणीस, विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी संघटना, ठाणे.