News Flash

प्रीपेड रिक्षा योजनेचा बोऱ्या

या रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान २७ रुपयांच्या दराची आकारणी करण्यात येत होती.

(संग्रहित छायाचित्र)

जास्त भाडय़ामुळे सेवेकडे प्रवाशांची पाठ

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा संघटनेच्या माध्यमातून शहरात सुरू केलेल्या प्रीपेड रिक्षा योजनेचा नियोजनाअभावी बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे. ठाण्यातील महिला तसेच अन्य प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी ही सेवा सुरू झाली होती. मात्र जास्त भाडय़ामुळे या योजनेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद होता. आता काही महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणे थांबल्याचे दिसून येत आहे.

महिला प्रवाशांचा रिक्षाप्रवास सुरक्षित व्हावा तसेच भाडय़ावरून ग्राहक-चालक यांच्यात वादावादी होण्याच्या घटना कमी करण्याच्या हेतूने  प्रीपेड रिक्षा सेवेचा आरंभ करण्यात येत होता. मात्र सुरुवातीपासूनच या रिक्षासेवेचे भाडे जास्त असल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. या रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान २७ रुपयांच्या दराची आकारणी करण्यात येत होती. कमीत कमी २ किमी प्रवासासाठी २७ रुपये, २ ते ४ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५४ रुपये तर ४ ते ६ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ८२ रुपये मोजावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. इतर रिक्षांच्या तुलनेत हे भाडेदर फारच जास्त असल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेस कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकतेचे वातावरण होते. ठाणे रेल्वे स्थानकालगत खास प्रीपेड रिक्षांसाठी उभारण्यात आलेल्या थांब्यावर येणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रथम पैसे भरून पावती दिली जात होती. त्यानंतर प्रवाशांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत होती. महागडय़ा भाडेदराने हा व्यवहार आतबट्टय़ाचा ठरणार हे स्पष्ट होऊ लागल्याने या प्रक्रियेत शहरातील जेमतेम ५० रिक्षाचालकांनी सहभाग दर्शविला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कसेबसे सुरू असणारे प्रीपेड रिक्षांचे हे दुकान पूर्णपणे बंद झाल्याचे दिसून येत आहे.

यासंबंधी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ‘प्रादेशिक परिवहन कार्यालय चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मात्र उपलब्ध सुविधांचा फायदा योग्य प्रकारे करून घेणे हे प्रवाशांचे कर्तव्य आहे. त्यामुळे ही योजना का बंद पडत आहे याचा विचार सगळ्यांनी करायची आवश्यकता आहे,’ असे त्या म्हणाल्या.

विजू नाटेकर रिक्षा संस्थेचे अध्यक्ष भाई टिळवे यांना विचारले असता त्यांनी आपण आजारी असल्यामुळे गावी आलो आहे असे सांगितले. मात्र दोन-तीन दिवसांत या रिक्षा पूर्ववत कशा होतील यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधी काही रिक्षाचालकांकडे विचारणा केली असता प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे रिक्षाचालकांचा या योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:26 am

Web Title: prepaid rickshaw issue
Next Stories
1 ‘गॅझेट’ संस्कृतीमुळे गावाकडची मुले शाळेत
2 पादचारी पुलाच्या दिरंगाईमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त
3 दुर्मीळ श्वेत करकोच्याचे वसईत दर्शन
Just Now!
X