ठाण्यात तंदुरुस्तीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘प्रीपेड’चे वारे; वेळेनुसार वापरास मुभा

धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक जण योगा, जीम तसेच अलीकडच्या काळात फिटनेस राखण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात आलेले झुम्बा, अ‍ॅरोबिक्स यासारख्या पर्यायांची चाचपणी करताना दिसतात. मोठय़ा जीममध्ये वर्षांचे पैसे भरून मोकळेही होतात. मात्र अनेकदा व्यायामाचा कंटाळा करणारी मंडळी ‘वेळ नाही’ या सबबीखाली वर्षभरासाठी भरलेल्या पैशावर पाणी सोडण्यासही तयार होतात. अशा आरंभशूरांसाठी ठाण्यात ‘सेवेचा जितका वापर तितकेच पैसे भरा’ या प्रिपेड संकल्पनेवर आधारित फिटनेसचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आपल्या सवडीनुसार व्यायाम करताना प्रिपेड मोबाइलप्रमाणेच पैसे भरण्याची ही संकल्पना ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे.

दररोजच्या धावपळीतून वेळ काढत आरोग्य चांगले व सुदृढ राखता यावे यासाठी अनेक जण योगा, व्यायामांचे विविध पर्याय निवडत असतात. व्यायामाची सेवा पुरविणाऱ्या विविध संस्थांकडे महिन्याची किंवा वार्षिक सदस्य शुल्क भरण्याची सोय उपलब्ध असते. तसेच फिटनेसकरिता आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा वापर करण्यासाठी संस्थांनी वेळ निश्चित केलेली असते. फिटनेसकरिता अनेक जण अशा संस्थांकडे शुल्क भरून सदस्यत्व घेतात; परंतु संस्थेने निश्चित केलेली वेळ आणि कामाची वेळ याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांना व्यायामाचे लोढणे नकोसे वाटू लागते. यामुळे त्या दिवसांचे पैसे तर वाया जातातच शिवाय सदृढ आरोग्याची इच्छाही अपुरी राहते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ‘फिटजिनी’ या संस्थेने ठाण्यात फिटनेसचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. प्रीपेड मोबाइलद्वारे ग्राहकाला हवे तेवढेच रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असते. या धर्तीवर संबंधित संस्थेने ठाणेकरांना फिटनेसच्या प्रकारांकरिता पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  या योजनेअंतर्गत संस्थेचे सदस्यत्व घेण्याची गरज नाही. फिटजिनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर संबंधितांना आवडीच्या कोणत्याही फिटनेस सेंटरमध्ये एका सत्रासाठी बुकिंग करता येऊ शकते. तसेच त्या विशिष्ट सत्रासाठीच त्यांना पैसे भरण्याची मुभा मिळणार आहे याशिवाय, घरपोच वैयक्तिक प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञांच्या सेवाही उपलब्ध होणार आहे.

मिश्र व्यायामाची सुविधा

फिटनेसच्या सर्वच सोयी पाहिजे त्या ठिकाणी घेता याव्यात म्हणून फिटजिनीने ठाण्यातील शंभरहून अधिक फिटनेस सेंटरचे पर्याय संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. आठवडय़ातील प्रत्येक दिवशी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आवडीनुसार निवडून ते करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे सोमवारी योगासने, मंगळवारी बॉक्सिंग, बुधवारी झुंबा असे फिटनेस प्रकार करता येऊ शकतील. फिटनेस सेंटरमध्ये मात्र अशा प्रकारची सुविधा नसते. मिश्र पद्धतीचा व्यायामही या संकल्पनेमुळे करणे शक्य होणार आहे, असा दावा संस्थेने केला आहे.