12 July 2020

News Flash

वसईत नाताळ सणाच्या आगमनाची तयारी

२५ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नाताळ उत्सवाची तयारी म्हणून ही मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.

चर्चमध्ये जांभळ्या रंगाच्या मेणबत्तीचे प्रज्वलन; घराघरांमध्ये रंगरंगोटी, फराळ, सजावट, गोठे यांची जय्यत तयारी

वसई : ख्रिस्ती उपासनेत अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाताळ सणानिमित्त डिसेंबरच्या पहिल्या रविवारी वसईतील सर्व चर्चमध्ये जांभळ्या रंगाच्या मेणबत्तीचे विधीपूर्वक प्रज्वलन करण्यात आले. २५ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नाताळ उत्सवाची तयारी म्हणून ही मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.

डिसेंबर महिना सुरू झाला की ख्रिस्ती भाविकांना वेध लागतात नाताळ य्सणाचे. या सणाच्या आध्यात्मिक तयारीचाच भाग म्हणून रविवारी वसईतील सर्व चर्चमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जाते, असे ‘युवदर्शन’चे संचालक फा. रेमंड रूमाव यांनी सांगितले.

नाताळ सणानिमित्त डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश दिला जातो. त्यानंतर २४ डिसेंबरच्या मध्यरात्री येशूजन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून आगमन काळ म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या येण्याची तयारी सुरू केली जाते. यानिमित्त घराघरांमध्ये साफसफाई, रंगरंगोटी, फराळ बनवणे, सजावट करणे, गोठे तयार करणे इत्यादी तयारी सुरू होते. त्याचप्रमाणे चर्चमधून धर्मगुरू भाविकांची आध्यात्मिक तयारी सुरू करतात. विविधरंगी मेणबत्त्यांचे प्रज्वलन हाही या तयारीचाच भाग असल्याचे फा. रेमंड रूमाव यांनी सांगितले. नाताळनिमित्त चर्चमध्ये मेणबत्ती प्रज्वलनाचा संबंध पुरातन काळी साजरा केल्या जाणाऱ्या सूर्याच्या सणाशी आहे. उत्तरायण सुरू होणार, नवनिर्मितीसाठी पान गळती होते इत्यादींचे प्रतीक म्हणूनही मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येते. मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देते तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व फा. रेमंड रूमाव यांनी स्पष्ट केले.

नाताळ सण कसा?

इसवी सन २८५ पासून ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस हा शब्द जुन्या इंग्रजी ख्रिस्तेस मेस्सा (म्हणजे ख्रिस्ताच्या नावाने साजरी होणारी उपासना) या शब्दापासून तयार झालेला आहे. मराठीमधला ‘नाताळ’ हा शब्द ‘नातालीस’ (म्हणजे जन्म घेणे) या लॅटीन भाषेतून आलेला आहे. त्याचा उगम थेट रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन याच्या कारकीर्दीपासून झाल्याचे मानले जाते. तोपर्यंत रोमन साम्राज्यात सूर्योपासना केली जायची. २२-२३ डिसेंबरला सूर्याचे दक्षिणायन सुरू होऊन दिवस मोठे होत जातात. त्यामुळे तो सूर्याचा जन्मदिन मानला जायचा. परंतु इसवी सन ३१३ मध्ये ख्रिस्ती धर्माला रोममध्ये राजाश्रय मिळाल्यामुळे हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा होऊ  लागला. पुढे ख्रिस्ती उपासनेची जेव्हा दिनदर्शिका तयार करण्यात आली, तेव्हा २५ डिसेंबर ही तारीख नाताळसाठी निश्चित केली गेली, अशी माहिती बायबलचे अभ्यासक तथा विचारवंत फा. रॉबर्ट डिसोजा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:50 am

Web Title: preparation of christmas festival in vasai zws 70
Next Stories
1 पुलंच्या अपरिचित साहित्याचा अभिवाचनातून अनोखा ‘शब्दवेध’
2 ठाण्यातील वृक्ष कत्तलप्रकरणी गुन्हा 
3 ‘आणखी पु. ल.’ विशेषांकाचे आज ठाण्यात प्रकाशन
Just Now!
X