कळवा खाडीपुलास पर्यावरण विभागाची मंजुरी
ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेने आखलेल्या चार उड्डाणपुलांच्या कामातील प्रशासकीय मंजुरीचे अडथळे अखेर दुर झाले असून ही कामे सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली पुर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. कळवा खाडीवर तिसरा उड्डाणपूल उभारण्यासाठी तिवरांची कत्तल करावी लागणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेस पर्यावरण विभागाने काही महिन्यांपुर्वी हिरवा कंदील दाखविला होता. यासंबंधीच्या बैठकीेचे आणि निर्णयाचे इतिवृत्त प्राप्त होण्यास उशीरा होत असल्याने प्रत्यक्ष कामे सुरु करता येत नव्हते. चार दिवसांपुर्वी यासंबंधीच्या निर्णयाचा अंतिम ठराव महापालिकेस प्राप्त झाला असून त्यामुळे या उड्डाणपूलाच्या कामासाठी आवश्यक असलेली मातीच्या चाचणीचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नौपाडा, हरिनिवास चौक, मीनाताई ठाकरे चौकात तीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी सुमारे २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंबंधीची निवीदा प्रक्रिया पुर्ण झाली असून जे.कुमार कंपनीस हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे ठराव मंजुर होऊन चार महिन्यांचा कालावधी ऊलटला आहे. प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही.
दुसरीकडे, कळवा खाडीवर तिसरा उड्डाणपूल उभारण्याच्या कामास तब्बल वर्षभरापुर्वी मंजुरी देण्यात आली आहे. यासंबंधी पर्यावरण विभागाच्या आवश्यक मंजुऱ्या प्राप्त होऊनही काम सुरु होत नसल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. ठाणे शहरासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे असा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आग्रह असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र उड्डाणपूलांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासंबंधी प्रशासनाने अद्याप विचारही केलेला नाही, अशी माहिती ठाणे लोकसत्ताशी बोलताना दिली. कळवा उड्डाणपूलाच्या कामास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असली तरी यासंबंधीचा अंतिम ठराव प्रशसानास प्राप्त झाला नव्हता. हा ठराव चार दिवसांपुर्वीच मंजूर झाला असून पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेली मातीची चाचणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरातील उड्डाणपुलांची कामेही सुरु झाली आहेत. या कामांची पुर्वतयारी पुर्ण होत आली असून वाहतूकीचे नियोजनही केले जात आहे. या कामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम घ्यावा किंवा नाही हे येत्या काही दिवसात ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.