देखरेखीसाठी पाच जणांची समिती; विविध विभागांतील ८५ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती

ठाणे महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच निवडणूक कामांच्या पुर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक कामांसाठी पाचजणांची समिती स्थापन केली असून ही समिती निवडणुकीच्या कामांवर देखरेख ठेवणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कामे वगळता अन्य कामांची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी विविध विभागातील ८५ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. निवडणूक अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात दुवा म्हणून समन्वयक अधिकारी काम पाहणार आहेत.

दोन महिन्यांवर ठाणे महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली असून या निवडणूकीसाठी पुढील महिन्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आतापासून निवडणूक पूर्व कामांची तयारी सुरू केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय मतदारांची प्रारुप यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली असून त्यापाठोपाठ आता निवडणुकीची अन्य कामे करण्यासाठी नियोजन आखण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने पाच अधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये महापालिका मुख्यालय उपायुक्त संजय निपाणे, उपायुक्त (निवडणूक) ओमप्रकाश दिवटे, शहर विकास विभागाचे अधिकारी प्र.ल. गोहील, नगरअभियंता रतन अवसरमोल आणि विकास ढोले या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी उपायुक्त संजय निपाणे यांना मतदार यादी तयार करण्यासाठी विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकीचे काम कामकाजासाठी सुमारे १६ ते २० निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीची कामे केली जाणार आहे. असे असले तरी या निवडणुकीच्या कामांचे स्वरुप व्यापक असल्यामुळे या अधिकाऱ्यांची कामे वगळता अन्य कामांसाठी पालिका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या कामकाजात सुसूत्रता रहावी म्हणून पालिका अधिकाऱ्यांवर अशाप्रकारची जबाबदारी देण्यात आली आहे. तब्बल ८५ कामांची यादी प्रशासनाने तयार केली असून त्यासाठी एका अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून नेमले आहे. या अधिकाऱ्यांमुळे निवडणूक अधिकाऱ्यांना सातत्याने पालिकेच्या विविध विभागांशी संपर्क साधावा लागणार नसून ही सर्व कामे समन्वयक अधिकारी पार पाडतील. यात निवडणूक कार्यालयात लागणारे साहित्य, सुविधा, मतदार यादी तयार करणे, प्रसिद्ध करणे, हरकती मागविणे, स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करणे, संगणक तसेच अन्य कामे समन्वयकांमार्फत केली जाणार आहेत.

दुवा म्हणून काम करणार

सार्वत्रिक निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीसाठी महापालिकेतील प्रत्येक विभागातील एका अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून समन्वयक अधिकारी काम करणार आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे काम सोपे होणार असून त्यांच्या कामात सुसूत्रता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.