कल्याण-डोंबिवली पालिकेने अनुभव नसलेल्या कंपनीला दिलेले काम थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अनुभव नसतानाही कल्याण-डोंबिवलीतील मलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या कामाला त्वरित स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मे. अ‍ॅकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर असे या कंपनीचे नाव असून कोकण विभागीय आयुक्तांनी त्यांचा १४ कोटींचा ठेका दोन वर्षांपूर्वी रद्द केला होता. त्यानंतरही याच कंपनीला तीन कोटी ७४ लाख ६९ हजार रुपयांचे देखभालीचे कंत्राट दोन महिन्यांपूर्वी देण्यात आले होते.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे एक वर्षांचे काम मे. अ‍ॅकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. या कामासाठी जेटिंग वाहने आणि आवश्यक कामगार ही कंपनी पालिकेला पुरवणार होती. ऑगस्टमधील स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

अ‍ॅकॉर्ड कंपनीला कल्याण-डोंबिवलीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मलनिस्सारणाच्या कामाचा पूर्वानुभव नाही. या कंपनीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे पालिकेत मलनिस्सारणाची कामे केलेली नाहीत. हे काम मिळविण्यासाठी या वेळी कंपनीने मोठय़ा पालिकेच्या दरांचा आधार न घेता कमी लोकसंख्या असलेल्या जोधपूर, उल्हासनगर पालिकेतील दरांचा संदर्भ दिला आहे. कल्याण, डोंबिवलीची लोकसंख्या १५ लाख आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या शहरातील कामाचा अनुभव कंपनीला नाही.

ठाणे, मुंबई परिसरातील दरांचा संदर्भ घेऊन मे. अ‍ॅकॉर्डने पालिकेची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे या कंपनीच्या ठेक्याबद्दल संशय आहे, अशी तक्रार भाजपचे नगरसेवक राजन सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

२०१४ मध्येही कल्याण-डोंबिवली पालिकेने अ‍ॅकॉर्ड कंपनीला १४ कोटी चार लाखांचे मलनिस्सारण देखभालीचे काम दिले होते. या प्रकरणाची तक्रार येताच कोकण विभागीय आयुक्तांनी चौकशी केली होती.

कंपनीला कामाचा अनुभव नाही. पालिकेने ढिसाळपणे निविदा प्रक्रिया राबवली, असे निरीक्षण नोंदवत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीवरून शासनाने अ‍ॅकॉर्डचा ठेका रद्द केला होता. असे असताना पुन्हा या कंपनीला काम देण्यामागे काय कारण आहे, असा प्रश्न सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

सामंत यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने या कामाला स्थगिती देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्याच्या सूचना नगरविकास प्रधान सचिवांना दिल्या आहेत. पालिकेतील काही नगरसेवक हे काम अ‍ॅकॉर्डला मिळावे, यासाठी चार वर्षे प्रयत्नशील असल्याची चर्चा कल्याण-डोंबिवली पालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिका अनभिज्ञ

मलवाहिन्या देखभाल दुरुस्तीचे काम मे. अ‍ॅकॉर्ड या ठेकेदाराला दिले आहे. पण या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची कोणतीही माहिती किंवा पत्र पालिकेला प्राप्त झालेले नाही, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.