26 February 2021

News Flash

हलव्याच्या दागिन्यांवर यंदा ‘संक्रांत’ नाही!

मकर संक्रातीनिमित्त घातल्या जाणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांना मात्र महागाईची झळ बसलेली नाही.

काळ्या साडीचा पेहराव आणि त्यावर सुरेख विणलेले हलव्याचे दागिने हे अनेक नववधूंसाठी आकर्षण ठरत असते.

सणविशेष अलंकारांच्या किमती ‘जैसे थे
डाळी, भाज्या यांसारख्या जीवनावश्यक घटकांच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांवर संक्रांत आणली असताना मकर संक्रातीनिमित्त घातल्या जाणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांना मात्र महागाईची झळ बसलेली नाही. गेल्या वर्षी हलव्याच्या दागिन्यांच्या किमती साधारणपणे २०० रुपयांपासून सुरू होत होत्या, यंदा मात्र त्या १५० रुपयांपर्यंत खाली घसरल्या आहेत.
वर्षांतील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असते. नववधूंसाठी तर हा सण नावीन्याचा असतो. काळ्या साडीचा पेहराव आणि त्यावर सुरेख विणलेले हलव्याचे दागिने हे अनेक नववधूंसाठी आकर्षण ठरत असते. या सणाला तिळगुळाएवढेच हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी महिला हौसेने हे दागिने घरीच तयार करीत असत. मात्र, आता हे दागिने तयार खरेदी केले जात असल्याने बाजारात या दागिन्यांची रेलचेल आहे. आतापर्यंत हे दागिने कारागिरांकडून तयार केले जात होते. त्यामुळे त्यांचे दर जास्त असत. आता यंत्राच्या साह्यने हे दागिने बनू लागल्याने त्यांच्या किमती कमी झाल्या असून त्यांत वैविध्यही आले आहे, अशी माहिती ठाण्यातील विक्रेते महेश गोडबोले यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
यंदा लफ्फा, चिंचपेटी, तन्मणी, वाकी, मेखल्यापासून ते कपाळावरची बिंदी, पायातले फक्त पैंजणच नव्हे तर जोडवीसुद्धा हलव्याच्या दागिन्यांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील यंदाच्या संक्रातीला विविधता आढळू लागली आहे. यंदा खास जावयांसाठी हलव्याचा कोटाला लावण्यासाठी ‘ब्रॉच’ही तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘महाराजा सेट’मधील सजवलेला फेटा, उपरणे आणि भिकबाळीचा तोरा असो या सर्व गोष्टी दागिन्यांमध्ये आहेत. त्याबरोबरच डिझायनर ज्वेलरी, हलव्याची साडी, हलव्याची पर्स यांचीही बाजारात रेलचेल आहे. हे दागिने बाजारात १५० रुपये ते १००० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत.

दागिन्यांचे महत्त्व
मकर संक्रांतीचा सण सुगीच्या हंगामात येतो. त्या वेळी सगळीकडे धनधान्याची रेलचेल असते. त्यामुळे लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. हल्ली तर हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 2:17 am

Web Title: prices of sugar ornaments fall ahead of sankranti
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 गुन्हेगारीच्या मुळाशी बेकायदा बांधकामे
2 तळे बुजविलेल्या जमिनीवर मीरा-भाईंदरचे नवे मुख्यालय?
3 जखमी विद्यार्थ्यांने दृष्टी गमावली..
Just Now!
X