29 September 2020

News Flash

आठवडय़ाची मुलाखत : नागरीकरणामुळे प्राचीन वारशाची हानी

देशातील सर्वात वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाची ऐतिहासिक परंपराही तितकीच प्राचीन आहे.

| June 23, 2015 05:46 am

देशातील सर्वात वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाची ऐतिहासिक परंपराही तितकीच प्राचीन आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कलियान (कल्याण) आणि शूर्पारक (सोपारा) या दोन बंदरांमधून अगदी प्राचीन काळापासून जगातील विविध देशांमध्ये व्यापार उदिम सुरू होता. शिलाहार काळातील अप्रतिम शिल्प तसेच वास्तुकलेचा नमुना असलेल्या अनेक शिवमंदिरांचे अवशेष ठाणे जिल्ह्य़ातील तत्कालीन कला संपन्नतेची साक्ष देत आहेत. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांनी त्यांच्या ‘असे घडले ठाणे’ या ग्रंथातून ठाणे परिसराचा हा इतिहास सविस्तरपणे मांडला आहे. ‘मुस्लिम स्थापत्यशैली व कला’ या त्यांच्या पुस्तकास नाशिक येथील नगरवाचन मंदिर तसेच मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांचा रेगे पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र इतिहास परिषदेने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्याचे नुकतेच घोषित केले आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

प्राचार्य डॉ. दाऊद दळवी
ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक
’ठाणे शहराला अगदी सातवाहनकाळापासून म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. त्यावेळचे ठाणे नेमके कसे होते ?
सातवाहन काळातील शिलालेखांमधून कल्याण, कृष्णगिरी, शूपार्रक, मांडव (महाड) इत्यादी नगरांची आणि बंदरांची माहिती मिळते. मात्र आश्चर्य म्हणजे त्याकाळात ठाण्याचा उल्लेख मिळत नाही. माझ्या मते त्या काळात ठाणे म्हणजे भिवंडी, कल्याण आणि जुन्नर हा व्यापारी तिठा असावा. आताच्या ठाणे खाडी किनाऱ्यालगत त्याचे केंद्र असावे. कारण ठाणे खाडी किनारी प्राचीन बंधारे आढळून आले आहेत.
’प्राचीन काळात ठाणे परिसरातील बंदरांमधून कोणकोणत्या देशांमध्ये व्यापारउदिम सुरू होता?
साधारणत: इसवीसनपूर्व पहिल्या शतकापासून भारताची पश्चिम किनारपट्टी दर्यावदी देशांना माहिती झाली होती. केरळ ते गुजरातदरम्यान अनेक बंदरे होती. त्यात सुरत, भडोच, शूपार्रक, चिंचणी-तारापूर, डहाणू, मनोर, कल्याण, कृष्णगिरी, घारापुरी, चौल, दंडा राजापुरी, गोवा आदींचा उल्लेख करता येईल. पश्चिम व उत्तर आशियातील छोटे-मोठे देश, ग्रीस, रोम, इजिप्त तसेच युरोपातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध होते. त्याकाळात भारतात बौद्ध धर्माचा प्रभाव होता. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आचार्य व त्यांचे शिष्य विविध देशांची भ्रमंती करीत होते.
’मग कितीतरी नंतर आलेल्या वास्को द गामाने भारताचा शोध लावला असे का म्हणतात?
वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही. त्याने इथे येण्याचा नवा मार्ग शोधला, इतकेच.
’सातवाहन काळात बरीच लेणी खोदण्यात आली. त्यांचे प्रयोजन काय?
लेणी आणि भव्य स्थापत्यशिल्पे ही त्याकाळातील सुबत्तेचा पुरावा आहेत. तत्कालीन राजव्यवस्था व समाज सुखसंपन्न होता. त्यामुळेच कलेला पूरक वातावरण निर्माण झाले. बौद्ध भिख्खूंनी अनेक लेणी खोदली. स्थापत्य कलासौंदर्याचे नवे आदर्श निर्माण केले. बौद्ध धर्माचा प्रसार होण्यासही त्याची मदत झाली. पुढील काळात शिलाहारांनी सातवाहनांचा धार्मिक आणि कलात्मक वारसा पुढे सुरू ठेवला.
’शिलाहारांनंतर कलेचा हा वारसा लोप पावलेला दिसतो, असे का झाले असावे?
साधारणत: बाराव्या शतकापर्यंत शिलाहारांचे राज्य होते. पुढे मात्र देशावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेराव्या शतकाच्या मध्यावर अल्लाउद्दिन खिलजीने भारतावर आक्रमण केले. मोगल तसेच पोर्तुगीज आक्रमकांना येथील संस्कृतीशी कोणतेही देणेघेणे नव्हते. त्यांनी विध्वंस सुरू केला. त्यामुळे सहाजिकच पुढील काळात दुर्दैवाने कलेचा हा वारसा खंडित झाला.
’त्या सोनेरी कालखंडाच्या खुणा कुठे पाहायला मिळतात?
ठाणे शहरात आता फारच थोडे कलात्मक अवशेष शिल्लक राहिले आहेत. अंबरनाथ येथे सुदैवाने शिलाहारकालीन स्थापत्य वैभवाची ठळक खूण शिवमंदिराच्या रूपात आताही आपण पाहू शकतो. याशिवाय भिवंडीजवळचे लोनाड, आटगाव, मुंबईतील वाळकेश्वर आदी ठिकाणी प्राचीन कलाअवशेष पाहता येतात.
’ठाणे शहरातील तलाव कोणत्या काळात आणि का खोदण्यात आले ?
ठाण्यातील तलाव शिलाहार काळात म्हणजेच साधारणत: हजार वर्षांपूर्वी खोदण्यात आले. शिलाहार राजे शैववंशीय होते. त्यांनी त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी शिवमंदिरे आणि त्या लगत तलाव खोदले. कौपीनेश्वर, सिद्धेश्वर, खिडकाळी, लोनाड अशी अनेक उदाहरणे आताही त्याची साक्ष देत आहेत.
’आक्रमकांच्या तावडीतून व नैसर्गिक आपत्तीतून वाचलेले प्राचीन कलावैभव जपण्यासाठी काय करायला हवे?
औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे प्राचीन वारशाची मोठी हानी झाली आहे. या वारशाची देखभाल करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाचा पुरातत्व विभाग आहे. मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडून ते काम नीटपणे होऊ शकलेले नाही. अंबरनाथ तसेच लोनाड येथील मंदिर परिसराचे अग्रक्रमाने संवर्धन होणे आवश्यक आहे. शासन कोटय़वधी रुपयांचा निधी संवर्धन, सुशोभीकरणासाठी जाहीर करते. मात्र प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत. याचे ठळक उदाहरण म्हणजे घोडबंदर किल्ला. या किल्ल्याच्या मजबुतीकरणासाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. खरेतर ही कामे परिसरातील इतिहासतज्ज्ञ तसेच पुरातत्व अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी खर्च होऊनही घोडबंदरच्या सौंदर्यात फारशी भर पडलेली दिसत नाही.
’प्राचीन वारसा आणि इतिहासाविषयी मोठय़ा प्रमाणात उदासीनता का आढळते?   
शालेय अभ्यासक्रमात स्थानिक इतिहासाला फारसे स्थान नाही. प्रचलित शिक्षण पद्धत मुलांना जगाचा इतिहास शिकवते, पण शहराचा, तालुक्याचा अथवा जिल्ह्य़ाचा इतिहास शिकवत नाही. त्यामुळे स्थानिक पुरातन वास्तू अथवा कलावारशांच्या पदरी उपेक्षा येते. शासनाने त्यासाठी जिल्हा अथवा तालुकास्तरीय इतिहास संवर्धन समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे.
’कोकण इतिहास परिषदेचा नेमका उद्देश काय ?
कोकण किनारपट्टी परिसरातील इतिहास संवर्धन तसेच लेखनासंदर्भात उदासीनता होती. ती मरगळ झटकून कोकणातील इतिहास संवर्धनाला एक माध्यम मिळावे, या हेतूने २०१० मध्ये कोकण इतिहास परिषदेची स्थापना केली. त्यात कोकणातील पाचही जिल्ह्य़ांमधील इतिहासप्रेमी, तज्ज्ञ तसेच प्राध्यापकांचा समावेश आहे. दरवर्षी विविध ठिकाणी परिषदेतर्फे अधिवेशन घेतले जाते. त्यात विविध संशोधनपर लेख वाचले जातात. परिषदेतर्फे एक त्रमासिकही प्रसिद्ध केले जाते. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्य़ातील लांजा येथे परिषदेचे सहावे अधिवेशन भरविले जाणार आहे.
– प्रशांत मोरे     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 5:46 am

Web Title: principal dr david dalvi interview for thane loksatta
Next Stories
1 शाळेच्या बाकावरून : ध्येय आदिवासी मुलांच्या विकासाचे!
2 ठाणे.. काल, आज, उद्या
3 बेकायदा चाळींचा खाडीकिनारी पूर
Just Now!
X