तिरुपती प्लाझा, भाईंदर पश्चिम

इमारतीमधील रहिवाशांची सुरक्षा, संकुलाची देखभाल याबाबत काटेकोरपणा असणारे संकुल म्हणजे भाईंदर पश्चिम येथील बालाजी नगर परिसरातील तिरुपती प्लाझा. एकंदर तीन इमारतींचे हे संकुल असून त्यात ९८ कुटुंबे राहतात. साधारण २००२ मध्ये हे संकुल उभे राहिले. इमारतीला भोगवटा दाखला मिळाला असून कन्व्हेअन्सची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

संकुलात तीन स्वतंत्र इमारती असल्या तरी एक सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. मात्र कार्यकारिणीमध्ये तीनही इमारतींमधील सदस्यांचा समावेश असेल यावर भर देण्यात येत असतो. महिन्यातील एका रविवारी कार्यकारिणीची बैठक, वार्षिक सभा नियमितपणे आयोजित करण्यात येतात आणि लेखापरीक्षणही मुदतीत करून त्याला मान्यता घेण्यात येत असते. संकुलाचा कारभार कार्यकारिणी पाहात असली तरी सोसायटीच्या कार्यालयात एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संकुलाच्या कोणत्याही सदस्याला सोसायटीचे कागदपत्र, हिशेब कधीही जाऊन पाहाता येतात.

संकुलाच्या आवारात दोन बगिचे असून त्याची देखभाल करण्यासाठी माळीची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय मुलांना खेळण्यासाठी खेळणीही बसविण्यात आली आहेत. संकुल आणि त्यातील सदस्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संकुलात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचा नियंत्रण कक्ष सोसायटीच्या कार्यालयात तयार करण्यात आला असून सुरक्षारक्षकाच्या कक्षामध्येदेखील ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून संकुलात नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थितीत गरजेचे असलेले दूरध्वनी संकुलातील प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच सुरक्षारक्षकाच्या कक्षामध्ये लावण्यात आले आहेत.

संकुलासाठी एकंदर चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यातील दोन सुरक्षारक्षक दिवसा आणि दोन सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी तैनात असतात. प्रत्येक सदस्याच्या घरी इंटरकॉम बसविण्यात आला असून संकुलात येणाऱ्या व्यक्तीची माहिती सुरक्षारक्षक आधी इंटरकॉमद्वारे सदस्याला देतो आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला संकुलात प्रवेश दिला जातो. वाहने उभी करण्यासाठी स्टिल्ट पार्किंग आहे शिवाय वाहनांची संख्या वाढू लागल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर संकुलातील मोकळ्या जागेत वाहने उभी केली जातात. यासाठी सोसायटीकडून शुल्क आकारले जाते.

संकुलाला महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सुरुवातीला नळजोडण्या कमी असल्याने सदस्यांना कमी पाणी मिळत होते, मात्र आता संकुलाला पुरेसे पाणी मिळत आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव सुधीर मिश्रा यांनी दिली. संकुलात स्वच्छता आणि देखभाल कायम राहावी यासाठी सफाई कर्मचारी नेमण्यात आले असून इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लिफ्ट टेक्निशियन यांच्याशी कायमस्वरूपी कंत्राट केलेले आहे. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती तातडीने संकुलात येऊन दुरुस्ती काम करून जातो. उंदरांच्या समस्येवरदेखील सोसायटीने उपाय शोधून काढला आहे. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठीदेखील कंत्राट देण्यात आले असून संबंधित कंपनी वेळोवेळी येऊन त्यावर उपाययोजना करत असते, अशी माहिती संकुलाचे अध्यक्ष वसंत राणे यांनी दिली. याशिवाय दर दहा वर्षांनी इमारतींची दुरुस्ती तसेच रंगकामदेखील केले जाते, जेणेकरून १५ वर्षांनंतरही हे संकुल नव्याने उभे राहिल्यासारखेच वाटत असते.

संकुलात १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण, होळी, गणेशोत्सव, नवरात्र, नववर्ष स्वागत आदी साजरे केले जातात. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे खेळ, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. संकुलात कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करण्यात येऊन महापालिकेला सहकार्य केले जाते. लवकरच संकुलात सौर ऊर्जा तसेच पावसाळी पाण्याचे नियोजन करणारी यंत्रणा बसविण्याचा कार्यकारिणीचा विचार आहे, असे सदस्य राजरतन दमानी यांनी सांगितले. सोसायटीचे कोषाध्यक्ष शिव सोमाणी असून संकुलाच्या देखभालीसाठी मनोज संघवी, वसंत आर्या, प्रवीण गुप्ता, माधवसिंह सोनाग्रा, ओमप्रकाश झवर, महेश दोढिया आदी सातत्याने सहकार्य करत असतात.

govinddegvekar@expressindia.com