20 October 2019

News Flash

खासगी बसची दुप्पट भाडेवाढ!

रेल्वेची प्रतीक्षा यादी, सुट्टय़ांचा हंगाम असल्याने एसटी महामंडळांच्या बसगाडय़ा प्रवाशांनी फुल्ल होत आहेत

उन्हाळी सुट्टय़ा सुरू झाल्याने ठाणे शहरातील एसटी बस स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. (छायाचित्र: सचिन देशमाने)

आशीष धनगर, किशोर कोकणे

सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या सर्वसामान्यांना फटका; २९ एप्रिलनंतर प्रवासभाडे आणखी महागण्याची शक्यता

दरवर्षी उन्हाळय़ाच्या सुट्टीत मुंबई, ठाण्यातून बाहेरगावी जाणाऱ्यांना मनमानी प्रवासभाडे आकारणाऱ्या खासगी टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या बसचालकांनी यंदा तिकीटदर दुपटीने वाढवले आहेत. येत्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी मतदानानंतर बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी होणार याचा विचार करून आधीपासूनच ही दरवाढ करण्यात आली असून यात आणखी ३० ते ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेल्वेची प्रतीक्षा यादी, सुट्टय़ांचा हंगाम असल्याने एसटी महामंडळांच्या बसगाडय़ा प्रवाशांनी फुल्ल होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी बसगाडय़ांमधून प्रवासाचे बेत आखले आहेत. सुट्टीच्या हंगामात ही संख्या वाढल्याने खासगी बसचालकांनी दरांमध्ये मोठी वाढ करण्यास सुरुवात केली असून ठाण्यात आतापासूनच तिकिटांच्या दरात दुप्पट दरवाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्याभरापासून ही दरवाढ सुरू असल्याने कोकणात किंवा पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

ठाण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी महिन्याभरापूर्वी साध्या बससाठी ३०० रुपये मोजावे लागत होते. त्याच बसगाडीचे दर आता ६०० रुपये झाले आहेत. गोव्यामध्ये पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही प्रचंड असते. गोव्यात जाण्यासाठी पूर्वी ५०० रुपयांची दर आकारणी होत असे, आता  हे दर एक हजार रुपये झाले आहेत.

२९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई, ठाण्यात मतदान होणार आहे. शनिवार आणि रविवारी सर्वाधिक आरक्षण असलेल्या खासगी टुर्स आणि ट्रॅव्हल्स बसेस या आठवडय़ात मात्र अनारक्षितच राहिल्याचे खासगी बसचालक आणि मालकांकडून सांगण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर ३० एप्रिल वगळता १ मे या दिवशी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. त्यामुळे अनेकांनी सुट्टय़ांचा बेत आखला आहे. त्यामुळे २९ तारखेला रात्रीपासूनच बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे अशी माहिती एका बसमालकाने दिली.

कारवाईचा इशारा

‘एसटी महामंडळांपेक्षा दीडपट प्रवासी भाडे खासगी वाहन चालक वाढवू शकत नाही. जर प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास त्या वाहन चालकाविरोधात तात्काळ कारवाई करून त्याचा परवाना निलंबित करण्यात येईल,’ अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली.

First Published on April 25, 2019 1:44 am

Web Title: private bus double fare increase