१८-४४ वयोगटातील ६५ टक्के जणांचे लसीकरण खासगी केंद्रांत; ठाणे शहरात एकूण पाच लाख जणांचे लसीकरण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या साडेपाच महिन्यांपासून राबवण्यात येत असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत पाच लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक लसीकरण पालिकेच्या केंद्रांमध्ये झाले असले तरी १८-४४ वयोगटाची मात्र खासगी केंद्रांनाच पसंती आहे. १८-४४ वयोगटातील ५९,५७२ लाभार्थीनी पहिली मात्रा तर १७३ जणांनी दुसरी मात्रा खासगी केंद्रांमध्ये घेतली आहे, या वयोगटातील ६५ टक्के लसीकरण खासगी केंद्रांमध्ये झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, ४५ वर्षांपुढील नागरिक अशा सर्वाचे लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेने नुकतेच १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५५ करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आहेत. उपलब्ध लस साठय़ानुसार त्यापैकी दररोज ३५ ते ४५ केंद्रे सुरू असतात. या केंद्रांवर आतापर्यंत ३ लाख ६६ हजार ७२२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. याशिवाय, ठाणे शहरातील १०८ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लसपुरवठा कंपन्यांकडून लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी रुग्णालयांना लसीकरण मोहीम राबविणे शक्य होत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांना पुरेसा लस साठा मिळू लागला असून उपलब्ध साठय़ानुसार खासगी रुग्णालये शहरातील गृहसंकुलांमध्ये सशुल्क लसीकरण मोहीम राबवीत आहेत.

पालिकेच्या केंद्रांवरही आता गर्दी

पालिका आणि खासगी केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील ८८ हजार १३० नागरिकांनी लशीची पहिली तर, ४०७५ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामध्ये खासगी केंद्रावर ५९ हजार ५७२ नागरिकांनी लशीची पहिली तर, १७३ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले होते. तर खासगी रुग्णालयांमार्फत या वयोगटाचे लसीकरण सुरू होते. या केंद्रांवर अनेकांनी शुल्क भरून लस घेतली. त्यामुळे खासगी केंद्रांवर या वयोगटाचे सर्वाधिक लसीकरण झाल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. परंतु आता पालिका केंद्रांवर या वयोगटाचे मोफत लसीकरण सुरू झाले असून या केंद्रांवर नागरिक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत.