खासगी, सहकारी बँकांचे कर्मचारी प्रशासनाकडून दुर्लक्षित

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू असली तरी संपूर्ण टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत गणल्या गेलेल्या खासगी तथा सहकार क्षेत्रातील बँकांची सेवा प्रशासनाकडून दुर्लक्षित झाली आहे. या बँक कर्मचाऱ्यांना अजूनही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या कर्मचाऱ्यांनी थेट केंद्रीय पातळीवर आपली कैफीयत मांडली आहे.

वसई-विरार शहरातील शेकडोजण मुंबईतील विविध सहकारी तथा खासगी बँकांमध्ये काम करतात. बँकांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आल्याने करोनाचा धोका वाढत असतानाही वसई-विरारमध्ये राहणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात आपापल्या खासगी वाहनांतून मुंबईतील कार्यस्थळी पोहोचून नागरिकांना सेवा दिली होती. काहींनी घरातून काम करून बँकिंग सेवेचा गुणात्मक दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  रेल्वे सेवा सुरू होऊन दीड महिना होत आला तरी बँक कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईची रेल्वेसेवा जवळपास अडीच महिने बंद होती. १५ जूनपासून ही सेवा करोनाविषयक नियमांना अधीन राहून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला सरकारी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बँकांच्या बाबतीत केवळ राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र पाहून रेल्वेप्रवासासाठी परवानगी दिली जात आहे. खासगी आणि सहकारी बँकांतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकातूनच माघारी पाठवले जात आहे.

मुंबईतील खासगी व सहकारी बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी हे वसई, विरार आणि त्यापलीकडे डहाणू, पालघर इत्यादी भागांत राहतात. खासगी वाहनाने मुंबईत येणे त्यांना अत्यंत त्रासाचे होत असल्यामुळे या बँक कर्मचाऱ्यांना रेल्वेप्रवासात सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टाळेबंदीच्या काळात करोनाचे जीवघेणे संकट बळावत असतानाही आम्ही आमच्या खासगी वाहनातून बँकेत जाऊन ग्राहकांना सेवा दिली आहे. मग आता आमच्या सेवेकडे सरकार दुर्लक्ष कसे काय करते? याबाबत आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री, वित्तमंत्री तथा राज्यपालांना निवेदन दिले आहे.

– जॉय फरगोज, खासगी बँक कर्मचारी

सहकारी बँकांमध्ये जे सुरक्षारक्षक आहेत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. पण बँकांमधील कर्मचारी रेल्वेने प्रवास करू शकत नाहीत, हे विचित्र आहे.

— अमेय तुस्कानो, सहकारी बँक कर्मचारी

अत्यावश्यक सेवेच्या दृष्टीने बँकांच्या बाबतीत केवळ राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेसेवेची मुभा दिली आहे. त्यानुसारच रेल्वे काम करत आहे.

— सुमित ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे