खासगी रुग्णालय शुल्कवाढीचा प्रस्ताव

ठाणे : करोना संकटाच्या काळात सरकारी तसेच खासगी रुग्णालयांचे महत्त्व वाढले असतानाच आता शहरातील खासगी रुग्णालये तसेच एकदिवसीय काळजी केंद्राच्या नूतनीकरण शुल्कात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नूतनीकरण शुल्कामध्ये २५० ते एक लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर यापूर्वी १५१ पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखापर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. या रुग्णांच्या उपचारासाठी सुरुवातीला जिल्हा शासकीय रुग्णालय होते. परंतु रुग्णसंख्येच्या तुलनेत ते अपुरे पडू लागल्यानंतर खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली. तसेच एमएमआरडी, म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातूनही पालिकेने रुग्णालये सुरू केली. त्यात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्त देयके वसूल केल्याचाही प्रकार समोर आला होता. यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यातच आता शहरातील खासगी रुग्णालये आणि एकदिवसीय काळजी केंद्रांच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी हे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तो येत्या १८ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

ठाणे शहरामध्ये एकूण ३७६ रुग्णालये आहेत. त्यामध्ये ३४७ खासगी रुग्णालये, महापालिकेची २६ आरोग्य केंद्रे, कळवा येथील महापालिकेचे रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे. नव्या प्रस्तावानुसार शहरातील १ ते १५० खाटांच्या रुग्णालयांच्या खासगी रुग्णालयांच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये २५० ते १ लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यापूर्वी १५१ पेक्षा जास्त खाटा असतील तर दहा लाख रुपये शुल्क होते. मात्र, नव्या प्रस्तावात अशा रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखापर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

रुग्णालये शुल्क दरपत्रक

खाटांची संख्या   जुने दर (रु.)    नवे दर (रुपये)

१ ते ५                २,७५०              ३,०००

६ ते १०             ३,७५०              ४,०००

११ ते २५            ४,७५०             ५,०००

१६ ते २०            ६,५५०              ७,०००

२१ ते २५            १५,५००           २०,०००

२६ ते ५०           ४२,५००            ५०,०००

५१ ते ७५           १,०००००          १,२५,०००

७६ ते १००          २,०००००          २,५०,०००

१०१ ते १५०         ५,०००००          ६,०००००

१५१ ते २००        १०,०००००         १,२५,००००

२०१ ते २२५       १०,०००००          १५,०००००

२२६ ते २५०        १०,०००००           २०,०००००

२५१ ते २७५         १०,०००००           २५,०००००

२७६ ते ३००          १०,०००००           ३०,०००००

३०१ ते ३५०           १०,०००००          ३५,०००००

३५१ ते ४००          १०,०००००           ४०,०००००