अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी सात दिवसांची मुदत

ठाणे : मुंब्रा येथील शिमला पार्क परिसरातील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे अग्निशमन दलाने पुन्हा शहरातील ३४७ खासगी रुग्णालयांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यापैकी ३४ रुग्णालये बंद पडली आहेत, तर २८२ रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित ६५ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले असून या रुग्णालयांची अग्निसुरक्षा वारंवार सूचना देऊनही वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णालयांना अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी सात दिवसांची पुन्हा मुदत देण्यात आली आहे.

राज्यात रुग्णालयांमध्ये आग लागून त्यात रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचे काम सुरू केले होते. त्यामध्ये २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असल्याचे तर ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली होती. या ६५ रुग्णालयांना नोटिसा बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. त्याकडे या रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. या ६५ रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले असून त्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे.

३१३ रुग्णालये सुरू

ठाणे शहरातील ३४७ खासगी रुग्णालयांपैकी मुंब्रा-शीळ अग्निशमन केंद्रांतर्गत ४३, जवाहरबाग अग्निशमन केंद्रांतर्गत १२०, वागळे अग्निशमन केंद्रांतर्गत ५९, कोपरी अग्निशमन केंद्रांतर्गत ६, पाचपाखाडी अग्निशमन केंद्रांतर्गत ५५ आणि बाळकुम अग्निशमन केंद्रांतर्गत ६४ रुग्णालये आहेत. त्यापैकी ३४ रुग्णालये बंद झाली आहेत. तर उर्वरित ३१३ रुग्णालये सुरू आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे शहरामधील ३४७ पैकी ३४ खासगी रुग्णालये बंद झालेली आहेत. उर्वरित ३१३ पैकी ६५ रुग्णालयांकडे अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे यापूर्वीच समोर असून त्यांना सात दिवसांमध्ये ही यंत्रणा बसविण्यास सांगितले आहे. याशिवाय २८२ रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महापालिका