21 September 2020

News Flash

करोना रुग्णांची लूट सुरूच

औषधांच्या पैशासाठी रुग्णाला एटीएममध्ये जाण्याची वेळ

औषधांच्या पैशासाठी रुग्णाला एटीएममध्ये जाण्याची वेळ

डोंबिवली : डोंबिवलीत खासगी करोना रुग्णालयांमध्ये रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांच्या तक्रारी सातत्याने वाढत असताना औषधांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका करोना रुग्णाला व्यवस्थापनाने चक्क बँकेच्या एटीएममध्ये पिटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवलीतील एक दाम्पत्य करोनाबाधित आहे. ज्येष्ठ नागरिक असलेली पत्नी गृह विलगीकरणात तर पतीला उपचारासाठी डोंबिवली मानपाडा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोना रुग्ण असल्यामुळे कोणीही कुटुंबीय, नातेवाईक रुग्णाजवळ नसते. रुग्णालयात दाखल होताना या रुग्णाने तात्काळ पैसे लागणार नाहीत असे वाटल्याने पैसे जवळ ठेवले नव्हते. आवश्यक सामान घेऊन ते रुग्णालयात दाखल झाले. पैशाची गरज लागली तर त्यांनी बँकेचे एटीएम कार्ड सोबत ठेवले होते. या रुग्णाला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. त्यामधील काही औषधे बाहेरून मागवावी लागतील असे सांगण्यात आले. ते पैसे तात्काळ द्यावे लागणार आहेत, असे या रुग्णाला सांगण्यात आले. आपणाकडे पैसे नाहीत. रुग्णालयाने ती औषधे आणून आपल्या खर्चात दाखवावीत. देयक भरणा करताना आपण ते पैसे एकदम देऊ, असे आर्जव या रुग्णाने केले. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने या रुग्णाचे काही ऐकले नाही. पैसे दिल्याशिवाय आवश्यक औषध, इंजेक्शन आणता येणार नाहीत, असे सारखे या रुग्णाला सांगण्यात येत होते. आपली मागणी मान्य होत नाही हे लक्षात आल्यावर रुग्ण सरळ रुग्णालयातून निघून बँकेत गेला. तेथील एटीएममधून आवश्यक तेवढे पैसे काढले. ते रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आणून दिले, असे रुग्णाशी संबंधित निकटवर्तीयांनी सांगितले.

या रुग्णाला रक्तद्रव (प्लाझ्मा)ची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी एका महाविद्यालयीन तरुणाच्या माध्यमातून रक्तद्रव देण्याची तयारी केली. परंतु, या रुग्णालयाने त्या तरुणाकडून कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी चार दिवस घालविले. अखेर कागदपत्रे जमविण्यात अडथळे आल्याने रुग्णालयाने परस्पर रक्तद्रव मिळविण्याची कार्यवाही केली, असे रुग्णाच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले. रुग्ण संबंधित रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा रुग्णालयाकडून त्रास नको म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला. या प्रकरणाची रुग्णाच्या नातेवाईकांकडून पालिका प्रशासन, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे रुग्णाला त्रास दिला असल्याची लेखी तक्रार आली तर त्याची चौकशी केली जाईल. खासगी करोना रुग्णालये शक्यतो रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगतात. अंतिम देयकाशी औषध खर्चाचा संबंध येणार नाही अशी व्यवस्था प्रत्येक रुग्णालयात आहे. रुग्णाचा विचार करून रुग्णालय व्यवस्थापनांनी सामंजस्याने वागावे अशा सूचना खासगी करोना रुग्णालयांना दिल्या आहेत.

सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

रुग्णालयातील कचरा विल्हेवाटीचा खर्चही देयकात

कल्याण : खासगी करोना रुग्णालयातून निघणारा कचरा विल्हेवाटीचा तसेच पीपीई किटचा खर्च रुग्णांच्या देयकात दाखवून वसूल करण्याचा प्रकार काही रुग्णालये करीत आहेत. कल्याणमध्ये असा प्रकार उघडकीला आला आहे. अशा प्रकारे आलेले एक वाढीव देयक एका ज्येष्ठ नागरिक महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यास रुग्णालयाने नकार दिला. अखेर एका नगरसेवकाने पुढाकार घेत देयक कमी करण्यास भाग पाडून त्या वृद्ध महिलेला घरी आणून सोडले.

रुग्णांकडून उपचाराचे पैसे घ्या असे शासनाचे आदेश आहेत. शासन आदेशावरून प्रशासनाने खासगी करोना रुग्णालयांवर करोना रुग्णांची देयक तपासणीसाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. असे असताना खासगी रुग्णालये देयक वसुली करताना रुग्ण, नातेवाईकांना वाढीव देयक देऊन त्यांना त्रास देत आहेत. कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिला रुग्ण आणि नातेवाईकांना रुग्णालयाच्या अरेरावी सहन करावी लागली. त्यांना १० दिवसांनंतर रुग्णालयाने उपचाराचे देयक दिल्यानंतर पीपीई किटचे १० दिवसांचे ५० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या खर्चाबरोबर करोना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्चही देयकात दाखविण्यात आला होता. एवढे फुगलेले देयक भरणे शक्य नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यवस्थापनाला सांगितले.  रुग्णालय ऐकण्यास तयार नव्हते. अखेर नातेवाईकांनी नगरसेवक महेश गायकवाड यांना घडला प्रकार सांगितला. देयक कमी करण्यास सुरुवातीला व्यवस्थापनाने नकार दिला. अवाजवी देयक कमी केले नाही तर होणाऱ्या परिणामांची जाणीव नगरसेवकाने व्यवस्थापनाला करून दिली. रुग्णालय देयक कमी करीत नाहीत. रुग्णाला सोडण्यात येत नाही हे पाहून नगरसेवक गायकवाड यांनी पीपीई किट घातले आणि ज्येष्ठ नागरिक महिलेला हातावर उचलून रुग्णालयातून बाहेर काढले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयाला शुल्क कमी करण्याचे सुचविले. त्यानंतर हे शुल्क कमी करण्यात आले.

करोना रुग्णांना अंधारात ठेवून त्यांच्या देयकाच्या माध्यमातून विविध प्रकारचे खर्च रुग्णांकडून वसूल केले जात आहेत. याप्रकरणी आपण आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.

महेश गायकवाड, नगरसेवक

अन्य रुग्णालयात करोनारुग्णांवर उपचार?

विशेष पथकाकडून तपासणी

ठाणे : महापालिकेने घोषित केलेल्या खासगी करोना रुग्णालयांव्यतिरिक्त अन्य रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आरोग्य विभागाची विशेष पथके तयार करून त्यांना तक्रारींबाबत खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.करोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावेत आणि या रुग्णांमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये या उद्देशातून महापालिकेने कोविड आणि अन्य रुग्णालये अशी वर्गवारी केली होती. अन्य रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करणे अपेक्षित असताना काही रुग्णालये करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे गेल्या काही दिवसांपासून प्राप्त होऊ लागल्या आहेत. या तक्रारींची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गंभीर दखल घेतली आहे. आयुक्त शर्मा यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्या आधिपत्याखाली विशेष पथकाची नियुक्ती केली असून तपासणी करण्याचे आदेश आयुक्त शर्मा यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 3:43 am

Web Title: private hospitals continue to charge excess from covid 19 patients zws 70
Next Stories
1 समुद्रकिनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग
2 रेल्वे प्रवासासाठी धडपड
3 छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावर पडून
Just Now!
X