खासगी रुग्णालयांपुढे पेच; करोनाच्या भीतीमुळे कामाला रामराम

ठाणे : करोना संसर्गाच्या काळात रुग्णालयांमध्ये काम केल्याने आपल्यालाही संसर्ग होण्याचा धोका संभावू शकतो या भीतीने जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, वार्डबॉय, महिला सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी कामाला रामाराम ठोकला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी कामगार मिळत नसल्याची समस्या रुग्णालय व्यवस्थापनाच्या समोर उभी राहिली आहे. करोनाकाळात रुग्णालयामध्ये कामगारांची नेमणूक करण्यासाठी व्यवस्थापनांनी आता परिचारिका, वार्डबॉय आणि रुग्णालयात साफसफाईची कामे करणाऱ्या महिलांना दुपटीने मानधन देण्यास सुरुवात केली आहे. मानधनात वाढ करूनही कामगार मिळत नसल्याने खासगी रुग्णालयांची मोठी पंचाईत झाली आहे.

करोनाच्या भीतीमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांतील खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय, साफसाफाईची कामे करणाऱ्या महिला आणि सुरक्षा रक्षक यांपैकी अनेकांनी नोकऱ्या सोडून दिल्या आहेत. सध्या कार्यरत असलेले कर्मचारीही रुग्णालय व्यवस्थापनाकडे वाढणाऱ्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर टिकवण्यासाठी आणि नवीन कर्मचाऱ्यांनी नियुक्त करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनांना अक्षरश तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचारी टिकावेत यासाठी मानधनवाढीचा पर्यायही स्वीकारण्यात आला आहे. यापूर्वी आठ ते दहा हजारांत काम करणारे वार्डबॉय, सफाईचे काम करणाऱ्या महिला आणि सुरक्षा रक्षक यांना सध्या १६ ते २० हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येत आहे, तर १३ ते १५ हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येणाऱ्या परिचारिकांना २६ ते ३० हजारांपर्यंत मानधन देण्यात येत आहे. असे असले तरी जिल्ह्य़ातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये काम करण्यास अनेक कर्मचारी नकार देत असल्याने घोडबंदर भागात असणाऱ्या एका बडय़ा रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील सूत्राने ‘लोकसत्ता’ला सांगितले. सध्या सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये कर्मचारी कमी असल्याने उपलब्ध असणाऱ्या वार्डबॉय आणि महिला सफाई कामगारांकडून अतिरिक्त कामे करून घ्यावी लागत आहेत.

पालिका रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची वानवा

करोनाकाळात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यातील विविध महापालिकांनी कंत्राटी पद्धतीने रुग्णालयात काम करण्यासाठी परिचारिका, वॉर्डबॉय यांची थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, करोनाकाळात या भरतीसाठी उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. सध्या वैद्यकीय कर्मचारी मिळत नसल्याने ठाणे महापालिकेने उभारलेले १ हजार खाटांचे कोविड रुग्णालय अर्ध्याहून अधिक रिकामे असून इतर पालिका रुग्णालयांचीही अशीच अवस्था आहे.