खासगी रुग्णालयांना पुरवठादारांकडून नकार; जुलै महिन्यात साठा मिळण्याची शक्यता

ठाणे : संपूर्ण देशभरात करोना प्रतिबंधित लशींचा अभूतपूर्व असा तुटवडा निर्माण झाला असतानाच गेल्या १ मेपासून शहरातील जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमधील लसीकरण मोहीमही ठप्प झाली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणानुसार मुंबईतील अपोलो, सेव्हन हिल्स, नानावटी आणि रिलायन्स या खासगी रुग्णालयांनी थेट लस उत्पादक कंपन्यांकडून साठा मिळवत गेल्या काही दिवसांपासून सशुल्क लसीकरण सुरू केले आहे. ठाणे शहरातील सातपेक्षा अधिक मोठय़ा रुग्णालयांनी देशातील दोन्ही लस उत्पादक कंपन्यांकडे लसपुरवठय़ासाठी पाठपुरावा सुरू केला असला तरी या रुग्णालयांना जुलै महिन्यापर्यंत तरी साठा मिळणार नाही, असे उत्तर कंपन्यांमार्फत देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

राज्य शासनाकडून लशींची मोठी मागणी यापूर्वीच नोंदवण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करणे शक्य होत नसताना खासगी रुग्णालयांना पुरवठा करणे शक्य नाही, असे उत्तरही कंपन्यांनी रुग्णालय व्यवस्थापकांना दिले आहे. नवी मुंबईत अपोलो रुग्णालयाचा एकमेव अपवाद वगळता ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्य़ात खासगी रुग्णालयांमध्ये लशींचा खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सशुल्क लसीकरण सुरू होण्यासाठी आणखी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता ठाणे शहरातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

ठाणे महापालिकेची एकूण ४७ लसीकरण केंद्रे आहेत, तर शहरात १४ खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे आहेत. लस तुटवडय़ामुळे पालिकेची अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्य़ातही वेगळी परिस्थिती नाही. नवी मुंबईचा अपवाद वगळला तर संपूर्ण जिल्ह्य़ात सर्वच खासगी रुग्णालयांमधील लसीकरण बंद झाले आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ठाण्यासह सर्वच शहरांमधील खासगी दवाखाने महापालिकांकडून अथवा स्थानिक प्रशासनाकडून १५० रुपये प्रति लस या दराने लस खरेदी करत असत. पुढे नागरिकांना ही लस २५० रुपयांना दिली जात असे. यामुळे सशुल्क लसीकरणाचा पर्याय रहिवाशांकडे उपलब्ध होता. १ मेपासून मात्र सर्वच खासगी रुग्णालयांना लशींचा पुरवठा बंद झाला आहे. महापालिका तसेच शासकीय यंत्रणांच्या केंद्रावर पुरेशा लशी उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयांना लशींचा पुरवठा बंद झाला आहे.

हा तुटवडा लक्षात घेता ठाण्यातील काही खासगी रुग्णालयांनी थेट लस उत्पादन कंपन्यांकडे मागणी नोंदवली होती. सद्य:स्थितीत ही मागणी पूर्ण करणे शक्य नाही, असे उत्तर या कंपन्यांकडून देण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे सचिव तसेच ठाण्यातील लुईसवाडी येथील हायवे रुग्णालयाचे समन्वयक भावे मारू यांनी दिली. शहरातील अन्य सहा रुग्णालयांनी अशाच स्वरूपाची मागणी कंपन्यांकडे नोंदवली आहे. त्यांनाही हेच उत्तर दिले जात आहे, असे मारू यांनी स्पष्ट केले.

महापौरांचा पुढाकार

मुंबईमध्ये लसीकरण मोहीम प्रभावी व्हावी यासाठी अनेक खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. परंतु मुंबई वगळता ठाणे शहरातील खासगी रुग्णालयामधील लसीकरण बंद करून ठाणे शहरावर एकप्रकारे अन्याय केला जात असून याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे, अशा स्वरूपाचे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांना कंपन्या थेट लस उपलब्ध करून देत आहेत. याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु या मागणीचा संबंधित कंपन्यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे याबाबत सहकार्य करावे, असे महापौर म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे.