20 April 2019

News Flash

ठाणे महापालिकेची ‘सौरशेती’

खासगी-सार्वजनिक सहभागातून दरवर्षी १५ लाख युनिट वीजनिर्मितीचा संकल्प

खासगी-सार्वजनिक सहभागातून दरवर्षी १५ लाख युनिट वीजनिर्मितीचा संकल्प

विजेची वाढती गरज आणि वीजनिर्मितीत येणाऱ्या अडचणी यांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या दिशेने पावले टाकत घोडबंदर तसेच डायघर परिसरात ‘सौरशेती’ प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू केला आहे. डायघर भागातील पाच एकर जागेवर खासगी सार्वजनिक भागीदारीतून एक मेगावॉट क्षमतेचा सौरवीज प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्यातून दरवर्षी १५ लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. याशिवाय शहरातील विविध मोकळय़ा भूखंडांवर छोटे सौरवीज प्रकल्प राबविण्याचाही पालिकेचा विचार आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरात ‘सौरशेती’ प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू केला आहे. डायघर भागातील पाच एकर मोकळ्या जागेवर सुमारे एक मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. हा प्रकल्प खासगी सार्वजनिक भागीदारातून उभारण्यात येणार असल्याने पालिकेला यावर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. पालिकेला केवळ प्रकल्पासाठी जागा द्यावी लागणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज संस्थेमार्फत वीजकंपन्यांना विकण्यात येईल. त्या उत्पन्नातील काही हिस्सा पालिकेलाही मिळणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतही भर पडणार आहे. याच धर्तीवर शहरातील पालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या मोकळय़ा जागेतही सौरशेती प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा विचार आहे. याशिवाय शहरातील मोकळ्या पडीक जागांवरही छोटे प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे.  यानिमित्ताने या भूखंडांवर होणारी अतिक्रमणे टाळता येतील, अशी प्रशासनाची भूमिका आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

First Published on October 8, 2015 12:22 am

Web Title: private public participation will give 1 5 million unit electricity production
टॅग Tmc