महापालिकेवर पालकांचा मोर्चा; आयुक्तही हतबल

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात खासगी शाळेमार्फत शाळेचे मासिक शुल्क भरण्यास मुलांच्या पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे जोपर्यंत शाळेचे शुल्क भरत नाही तोपर्यंत परीक्षांचे प्रमाणपत्र दाखवण्यास शाळा तयार नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालकांनी महानगरपालिकेवर आपला मोर्चा काढला.

मीरा-भाईंदर शहरातील शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्या तरी ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खासगी शाळांकडून पालकांकडे शुल्कवसुलीसाठी वारंवार तगादा लावला जात आहे. याबाबत पालकांनी पालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडेदेखील तक्रार केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शाळांकडून ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या आहेत. त्याचे निकालदेखील ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

मात्र मीरा रोडच्या शांतीनगर शाळेने शाळा सुरू झाल्यापासूनचे शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना निकाल दाखवण्यास नकार दिला. या शाळेसह अन्य शाळांच्यादेखील तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच पालकांनी संपूर्ण वर्षांचे शुल्क न भरल्यास द्वितीय सत्राच्या परीक्षेला देखील बसू दिले जाणार नाही असे सांगत सक्तीची वसुली केली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पालकांनी शाळेतील व्यवस्थापनाकडे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे प्रत्यक्षात शाळेत आल्यानंतर वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे शुल्क आकारू नये अशी विनंती केली जात आहे. मात्र तीदेखील कमी करण्यास शाळा व्यवस्थापनांकडून नकार देण्यात आल्याने दीडशेहून अधिक पालकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात आंदोलन केले.

खासगी शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या नियमाचा मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मुलांचे पालकदेखील वारंवार महानगरपालिकेत तक्रार घेऊन येत असल्यामुळे यावर प्रशासनामार्फत धोरण निश्चित करण्याची मागणी महापौरांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्याचप्रमाणे तसे परिपत्रक काढून शाळांना देण्यात यावे, असे महापौरांनी सांगितले.

शाळेमार्फत वाढवण्यात आलेल्या फीची तक्रार अनेक पालकांनी केली आहे. परंतु फीवाढीवर पालिका प्रशासन कारवाई करू शकत नाही. मात्र त्याचप्रमाणे पालकांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग करून त्यावर तोडगा काढण्याचे काम करण्यात येत आहे.

विजय राठोड, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका