कामावरून ने-आण करण्यासाठी ४००-६०० रुपये भाडेआकारणी

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : शासनाच्या नव्या आदेशामुळे टाळेबंदीत शिथिलता येऊन खासगी कार्यालये सुरू झाली असली, तरी पुरेशा प्रमाणात वाहतुकीची साधने उपलब्ध होत नसल्यामुळे कर्मचारी, नोकरदार वर्गाचे हाल सुरू आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये प्रवाशांना पुरेशा प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध झाले नाहीत हे दिसून आले. सार्वजनिक वाहतुकीची कमतरता स्पष्टपणे दिसू लागल्याने डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर भागातील काही खासगी वाहतूकदारांनी या संधीचे सोने करण्याचा निर्णय घेतला असून सकाळ ते संध्याकाळी परत अशा वाहतुकीसाठी माणसी ४०० ते ६०० रुपयांचे विशेष पॅकेज वाहतूकदारांनी उपलब्ध करून दिले आहे.

लोकल सेवा बंद असल्याने शहरातील बस आगारातून सुटणाऱ्या केडीएमटी, बेस्ट, एनएमएमटी, एस. टी. बसने काही महिने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहेत. पाचव्या टाळेबंदीत शिथिलता आणल्याने अडीच महिने घरात अडकून पडलेले चाकरमानी आता मिळेल त्या वाहनाने गर्दीचा विचार न करता कार्यालयात पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. गर्दीचा सर्वाधिक धसका महिला प्रवासी घेत आहेत. करोनापेक्षा कार्यालयात पोहचणे हे प्रत्येक नोकरदाराचे लक्ष्य असल्याने बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होत आहे. यावेळी करोनाचे अंतर-साथसोवळे गुंडाळून ठेवले जात आहे. या गर्दीला कंटाळून अनेक प्रवासी खासगी वाहतूकदारांकडे गटागटाने मुंबई परिसरात प्रवास घडून आणू शकता का म्हणून विचारणा करत आहेत. प्रवाशांची मागणी विचारात घेऊन कल्याण, उल्हासनगर, डोंबिवलीतील खासगी वाहतूकदारांनी ठाणेमार्गे तर काहींनी ऐरोली, पूर्व द्रुतगती महामार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, नरिमन पॉइंट, कफ परडे, फोर्ट, चर्चगेट अशा प्रवासाची पॅकेज उपलब्ध करून दिली आहेत.

ही वाहने १७ आसनी, २५ आसनी आहेत. ती पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली आहेत. या वाहनांसाठी वाहतूकदारांनी ऑनलाइन नोंदणी सेवा उपलब्ध करून दिली आहे. वातानुकूलित सेवेसाठी ५०० रुपये तर साध्या बससाठी ४०० रुपये ये-जा करण्याचा दर आहे. सकाळी साडेसहा, सात, आठ वाजता ही वाहने मुंबईच्या दिशेने निघतील, त्यानंतर संध्याकाळी साडेपाच, सहा, साडेसहा वाजता ती पुन्हा प्रवासी घेऊन परतीच्या प्रवासाला निघतील.

अनेक नोकरदार वर्गाने विशेषत: महिलांनी अशा खासगी वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. काही नोकरदार आपली दुचाकी, चारचाकी आणि  सहकारी प्रवाशांना सोबत घेऊन कामाच्या ठिकाणी प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत.

राज्य परिवहन, बेस्ट आणि महापालिका परिवहनच्या बस गाडय़ांमध्ये सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी तुडुंब गर्दी असते. त्यामुळे अंतरसोवळ्याचे नियम पाळणे शक्य होत नाही. त्याऐवजी हा खासगी वाहतुकीचा पर्याय उत्तम असून या गाडय़ांमध्ये प्रवास करणारे प्रवासी आणि वाहतूकदार सर्व नियम पाळत आहेत. त्यामुळे प्रवास करताना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

– प्रवीण खरात, प्रवासी, डोंबिवली