अस्वच्छतेमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या शाळांची साफसफाई यापुढे खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी १६६ सफाई कामगारांचा दोन वर्षांकरिता पुरवठा करण्याकरिता प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार शाळेच्या सुमारे ८१ इमारतींची साफसफाई करण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १३२ प्राथमिक, तर १३ माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळेच्या इमारतींमधील वर्गखोल्या, व्हरांडा, आवार, मुख्य कार्यालये, हॉल, मुताऱ्या, शौचालये आदी साफसफाई करण्याकरिता पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे साफसफाई अभावी अनेक शाळांत घाण व कचरा आढळून येतो. कळवा, मुंब्रा परिसरांतील काही शाळांतील स्वच्छतागृहांची अवस्था तर अतिशय वाईट असल्याच्या तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाने बाहय़ यंत्रणेमार्फत शाळांची साफसफाई करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावानुसार, खासगी ठेकेदारामार्फत १६६ सफाई कामगार घेण्यात येणार आहेत. दोन वर्षांकरिता या ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या कामाकरिता सुमारे तीन कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र, या खर्चास सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा जास्त खर्च
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शाळा इमारतींच्या साफसफाईकरिता दोन कोटी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. मात्र, सध्याच्या प्रस्तावानुसार तीन कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. उर्वरित निधीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध करून घेण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, याआधीही उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना आता पुन्हा तोच कित्ता गिरवण्यात येत आहे.