कडोंमपाच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर; आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर भाजप, मनसेचा विरोध मावळला
कल्याण आणि डोंबिवलीतील प्रभागांमधील कचरा उचलण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सुरुवातीला शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आग्रह धरताच, भाजप, मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. कचरा उचलण्याच्या कामाला विरोध नाही पण खासगीकरणच का, या विषयावरून बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
महापालिका हद्दीतील लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. हा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. कचरा तयार होतो त्या प्रमाणात त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे न्यायालयाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. न्यायालयाने कचऱ्याचा प्रकल्प महापालिकेकडे नसल्यामुळे नवीन बांधकाम परवानग्या बंद केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे खासगीकरणाशिवाय पर्याय नाही. कचरा उचलण्याच्या क्षेत्रात आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. कचराकुंडी, कचरावाहू वाहने यांना सेन्सर बसविण्यात येतात. त्यामुळे कचऱ्याची कुंडी कोठे भरली आहे त्याची माहिती तात्काळ पालिकेला ऑनलाइन मिळणार आहे. कचरावाहू वाहने प्रभागात कोणत्या ठिकाणी आहेत, ती काय काम करतात, याची माहिती या नवीन तंत्रज्ञानाने मिळणार आहे. कचरावाहू गाडय़ांमध्ये स्कॅनर आहेत. ते गाडीमध्येच ओला, सुका, प्लास्टिक, धातूसारखा कचरा वेगळा करण्याची कामे करणार आहेत. कमी वेळात जास्त काम या कचरा जमा करणे व उचलण्याच्या कामातून होणार आहेत. १५ लाख लोकसंख्येमधून दररोज तयार होणारा कचरा उचलण्यासाठी ६ हजार कामगारांची गरज आहे. प्रत्यक्षात पालिकेकडे फक्त २५०० कामगार आहेत. नवीन कामगारांची भरती शासनाने बंदी केली आहे. नवीन भरती केली तरी त्यांचा आर्थिक बोजा पालिकेवर पडणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य नाही. ठेकेदाराची क्षमता पाहून त्यांना कामे देण्यात येतील, असे आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले.
काही प्रभागातच नेमणूक
आयुक्त ई. रवींद्रन यांनी कचरा उचलण्याचे नवीन तंत्र आणि शहरातील कचरा परिस्थितीचे भान आणून दिल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी कचरा उचलण्याच्या कामाचा खासगी ठेका देण्यास प्रशासनाला मान्यता दिली. कल्याणमधील ब, क, डोंबिवलीतील फ, ग प्रभागांमधील कचरा जमा करणे व त्याची वाहतूक करण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी यापूर्वीच्या अ‍ॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग या खासगी ठेकेदाराने कचरा उचलण्याच्या कामात कशा प्रकारे हलगर्जी केली याचे अनेक किस्से सुनावले. भाजप, मनसे सदस्यांची मते विचारात घेऊन, चार प्रभागांमधील कचरा खासगीकरणातून उचलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उर्वरित प्रभागांचा नंतर विचार करण्यात येणार आहे.