‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

ठाणे : घर विकत घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र, सध्या घरांच्या किमती इतक्या वाढत चालल्या आहेत की, घर खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबांना मोठा खटाटोप करावा लागतो. बऱ्याच धावपळीनंतर आपल्या हक्काच्या घराच्या किल्ल्या हातात आल्यानंतर चेहऱ्यावर झळकणारा आनंद सुखावणारा असतोच. पण पाल्र्यातील मधुस्मिता वीरकर यांच्या कुटुंबासह अन्य भाग्यवान कुटुंबांसाठी हा आनंद द्विगुणित करणारा ठरला. रोजा ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ या उपक्रमात सहभागी झालेल्या वीरकर कुटुंबीयांना गृहखरेदीसोबत थायलंडची सफर बक्षीस स्वरूपात मिळाली तर, अन्य कुटुंबांनीही आकर्षक बक्षिसे पटकावली.

‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच ठाण्यातील सीकेपी सभागृहात पार पडला. यंदाचे या उपक्रमाचे १०वे पर्व होते. ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमात सहभागी झालेल्या वाचकांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. यापैकी भाग्यवान विजेत्यांची निवड करून आकर्षक बक्षिसे या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी या उपक्रमाचे मुख्य विजेते ठरलेल्या मधुस्मिता वीरकर कुटुंबीयांना गृहखरेदीसोबत थायलंडची सफर बक्षीस स्वरूपात मिळाली. त्यांनी घोडबंदर येथील रोजा ओएॅसिस गृहप्रकल्पात घर खरेदी केले आहे. यावेळी ईशा टुर्सचे आत्माराम परब, रोजा ग्रुपचे कौस्तुभ महाजन यांच्या हस्ते वीरकर कुटुंबीयांना पारितोषिक देण्यात आले. वास्तुलाभ उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवरांकडून विजेत्या स्पर्धकांना विविध आकर्षक भेटवस्तूंनी गौरवण्यात आले. वास्तुरंग वास्तुलाभ उपक्रमासाठी सहकार्य करणारी अनेक मान्यवर मंडळी या समारंभात उपस्थित होती. यावेळी महालॅन्ड ग्रुपचे अक्षय जाधव यांनी वास्तुलाभ उपक्रमाचे कौतुक केले. जास्तीतजास्त लोकांना परवडणाऱ्या किमतीत समाधानकारक असे घर मिळावे असा ठाणेकर इन्फ्राचा कायम उद्देश असून वास्तुलाभसारखे उपक्रम या उद्देशाला अधिक सार्थकी ठरवत असल्याचे ठाणेकर इन्फ्रा ग्रुपच्या वैशाली ठाणेकर यांनी सांगितले. लोकसत्ता कायम आमच्यासोबत असून लोकसत्तावर आमच्यासह अनेक वाचकांचा विश्वास असल्याचे टीप टॉप प्लाझाचे रोहीतभाई शहा यांनी यावेळी सांगितले. लोकसत्तेमधील भाषा आणि लेखणी ही कायम वाचकांच्या पसंतीस पडणारी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक यांचे मनोबल वाढवणारा वास्तुलाभ हा उपक्रम असल्याचे निलसिद्धी ग्रुपचे दर्शन पालन यांनी सांगितले. तर ईशा टुर्सचे आत्माराम परब, रोजा ग्रुपचे कौस्तुभ महाजन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून वास्तुलाभ उपक्रमाचे कौतुक केले. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अन्य बक्षीस विजेते

महालॅन्ड यांच्याकडून प्लॉट खरेदी करणाऱ्या महेश पवार यांना वॉशिंग मशीन, निसर्ग ग्रीन्समधून घर खरेदी करणाऱ्या वैभव गायकवाड यांना वॉशिंग मशीन आणि अर्चना शेंडगे यांना टेलिव्हीजन सेट, ठाणेकर इन्फ्रामधून घर खरेदी करणाऱ्या दीप्ती खामकर यांना टेलिव्हीजन सेट, ओम श्री साई कृपा कन्स्ट्रक्शनमधून घर खरेदी करणाऱ्या सचिन व्हटकर यांना रेफ्रिजरेटर, निलसिद्धीमधून घर खरेदी करणाऱ्या विनोद सावंत यांना रेफ्रिजरेटर अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया

लहानपणापासून घरात वर्तमानपत्र म्हणजे केवळ लोकसत्ताच पाहिले आहे. लोकसत्ता आयोजित विविध उपक्रमात नेहमीच सहभागी होत असतो. वास्तुरंग वास्तुलाभ या उपक्रमातदेखील यंदा सहभाग घेऊन थायलंड सफरीचे पारितोषिक बक्षीसस्वरूपात मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे.

– मधुस्मिता राहुल वीरकर, मुख्य पारितोषिक विजेते (थायलंड सफर)

मूळचा सांगलीचा असून नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत आलो. सुरुवातीला राहण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र नंतर कष्ट करून घर खरेदी केले आहे. ओम श्री साई कृपा कन्स्ट्रक्शनमधून घर खरेदी केल्यावर लोकसत्ताच्या वास्तुरंग वास्तुलाभ उपक्रमात सहभाग घेऊन रेफ्रिजरेटरचे पारितोषिक मिळाल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे.

– सचिन व्हटकर, पारितोषिक विजेते (रेफ्रिजरेटर)

प्रायोजक

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रोजा ग्रुप आहेत. तर प्लॅटीनम पार्टनर निसर्ग ग्रुप, गोल्ड पार्टनर ओम श्री साई कृपा कन्स्ट्रक्शन, सिल्वर पार्टनर महालॅन्ड आहेत. तर हा कार्यक्रम पॉवर्डबाय प्रोजेनेसीस, निद्रा क्रिएशन, मोहन ग्रुप आहे. कार्यक्रमाचे हेल्थकेअर पार्टनर माधव बाग, वास्तुशास्त्र पार्टनर वास्तू रविराज असून ट्रॅव्हल पार्टनर ईशा टुर्स हे आहेत.