कोपरी

एका बाजूला विस्तीर्ण खाडीकिनारा आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे स्थानक व मुंबई-नाशिक महामार्ग या सर्वाच्या मधोमध कोपरी (ठाणे पूर्व) परिसर वसलेला आहे. येथील कोपरी गाव तसेच चेंदणी या भागात आगरी-कोळी समाज मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास असून या समाजाने नागरिकांनी घरांच्या आणि राहणीमानाच्या बाबतीत परंपरा जोपासली आहे; मात्र या भागातील मच्छीमारीचा व्यवसाय काळाच्या ओघात आता मागे पडत चालला आहे. सिंधी समाज संख्येने अधिक असून त्यांच्या वसाहतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या भागाचे गेल्या काही वर्षांत नागरीकरण झाले आहे, तसेच ठाणे पूर्व रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे.

कोपरीतील बहुतेक रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग कधीच कमी झालेली नसते. विविध कंपन्यांच्या बसगाडय़ा याच मार्गावरून धावतात. त्यामुळे ही कोंडी अधिकच वाढते. यावर उपाय म्हणून मध्यंतरी वाहतूक विभागाने वर्तुळाकार वाहतूक बदलांचा प्रयोग राबविला.

वाढीव बांधकामे, शौचालयाची दुरवस्था, अरुंद रस्ते आणि आरोग्य केंद्राची कमतरता अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या कोपरवासीयांपुढे सध्या तरी योग्य पर्याय सापडलेला नाही. कोपरीत जुन्या कापडांचा बाजार प्रसिद्ध आहे, मात्र त्यासाठी सुसज्ज बाजारपेठ नसल्याने रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. कोपरीतील कन्हैयानगरमध्ये दोन गॅस एजन्सीज आहेत. त्यामुळे या परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे ट्रक उभे राहतात. ट्रकमधील टाक्यांमध्ये गॅस भरलेला असल्याने या भागातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.

विशेष म्हणजे, विविध समस्यांनी ग्रासलेल्या कोपरी भागात मात्र अन्य प्रभागांच्या तुलनेत पाण्याचा मुबलक पुरवठा होतो.

आगरी-कोळी आणि सिंधी समाजाचे वास्तव्य

कोपरी विभागात सिंधी कॉलनी असा एक परिसर आहे. येथे १ ते २५ क्रमांकाच्या इमारतींत सिंधी समाजाचे वास्तव्य आढळते, तर ठाणेकर वाडी, कोपरी गाव, चेंदणी येथे आगरी-कोळी समाजाचे वास्तव्य आहे. तसेच मराठी समाज आणि उत्तर भारतीय नागरिकांचीही येथे वस्ती आहे. बारा बंगला या परिसरात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची घरे आहेत. कोपरी परिसराला पूर्वी आनंदनगर परिसर जोडण्यात आला होता आणि या भागात आठ नगरसेवक होते. मात्र, यंदाच्या नव्या प्रभाग रचनेत आनंदनगर परिसर शहरातील प्रभागांना जोडण्यात आला असून संपूर्ण कोपरी परिसराचा एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागातून यंदा चार नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि विद्यमान ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी कोपरीतील काही परिसरांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे असले तरी राष्ट्रवादीचे नगरसेवक भरत चव्हाण याच प्रभागातून गेल्या निवडणुकीत निवडून आले होते; मात्र त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील निवडणुकीमधील लढतींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

[jwplayer MbWfM2Rq]

कचरा, स्वच्छतागृह समस्या..

येथील महालक्ष्मी सोसायटीसमोर कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पडलेले असतात. बारा बंगला येथील १० क्रमांक बंगल्याच्या समोर कचरा पडलेला दिसतो. या भागात फारशा कचराकुंडय़ा नाहीत. कोपरी विभागातील हरी ओम नगर हा परिसर मुलुंड येथील कचराभूमीच्या लगत आहे. त्यामुळे दरुगधीमुळे हरी ओम नगर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. पारसी वाडी येथे ही स्वच्छतागृहांची समस्या दिसून येते.

सिंधी कॉलनी परिसर..

सिंधी कॉलनी परिसर हा एक ऐतिहासिक परिसर म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीच्या वेळी काही सिंधी नागरिकांना भारतात यावे लागले. या वेळी त्यांची उल्हासनगर परिसर आणि ठाणे येथील कोपरी परिसरात राहण्यासाठी सोय करण्यात आली. ठाणे कोपरी परिसरात सिंधी समाजासाठी १ ते २५ क्रमांकांच्या लष्कराच्या मालकीच्या असलेल्या इमारती त्यांना देण्यात आल्या होत्या. हा परिसर आता सिंधी कॉलनी म्हणून प्रसिद्ध आहे. या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे.

वाहतूक कोंडी समस्या

कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसर सतत गजबजलेला असतो. त्यामुळे येथे कंपनीच्या बसची वाहतूक सुरू असते. तसेच बेकायदा पार्किंगमुळे येथे वाहतूक कोंडी होते. सिंधी कॉलनी परिसरात रस्त्यावर भाजीवाले, फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याशिवाय येथील रस्ते अरुंद असल्याने कोंडीत भर पडते. मात्र, बांधकामांमुळे या भागातील रुंदीकरणाला फारसा वाव राहिलेला नाही.  बारा बंगला, कन्हैयानगर या परिसरांत रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. मुंबईला जाणाऱ्या वातानुकूलित बसगाडय़ाही याच ठिकाणी उभ्या केल्या असतात.

आरोग्य केंद्र नाही..

येथे आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र जेथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार होते, त्या ठिकाणी इमारतीचे काम सुरू आहे. कोपरीत एकच प्राथमिक केंद्र असून ते प्रभाग समिती कार्यालयात आहे. प्रसूतिगृहामध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचे महिलांकडून सांगण्यात येते.

सुसज्ज बाजारपेठ कधी होणार?

कोपरी गावाला अद्यापही सुसज्ज भाजी मंडई नाही. सध्या सर्व फेरीवाले, भाजीवाले रस्त्यावर वस्तुविक्री करत असतात. नागरी वस्तीच्या ठिकाणीच फटाक्यांचा बाजार भरलेला असतो.

प्रभाग क्रमांक – २०

अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब) सर्वसाधारण महिला

क) सर्वसाधारण महिला

ड) सर्वसाधारण लोकसंख्या – ५३४९०

प्रभाग क्रमांक क्षेत्र- कोपरी कॉलनी, चेंदणी,पारसी कॉलनी, ठाणेकर वाडी, बारा बंगला.

कोपरीमध्ये विविध वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येते. मात्र त्या कामानंतर खोदलेले रस्ते सुस्थितीत करण्यात येत नाहीत. वरचेवर खड्डे बुजविण्याची कामे करतात. त्यामुळे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नाहीत आणि अवैध पार्किंगची समस्या जाणवते. कचराकुंडीही या भागात नाही. रस्त्यांवर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

स्नेहा भावसार, कोपरी

वाहतूक कोंडीचा प्रश्न कोपरीवासीयांना भेडसावत आहे. पहिल्यापासूनच ठाणे पश्चिमेकडे अधिक लक्ष दिले गेले. त्यामानाने कोपरी भाग दुर्लक्षित राहिला आहे. तसेच घरांच्या वाढत्या किमती ही ठाण्यातील खूप मोठी समस्या आहे. या समस्यांवर येत्या निवडणुकीनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

राहुल शास्त्री, कोपरी, ठाणे

कन्हैयानगर येथे रस्त्याची चाळण झाली आहे. अवैध वाहतूक पार्किंग आहे. डासांचा अतिशय त्रास होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार परिसरात बळावत आहेत. त्यामुळे गटार, नाले स्वच्छ करावे आणि त्यावर झाकणे लावणे गरजेचे आहे. शौचालयाची सुविधा नाही.

वैभव पाटील, कोपरी

[jwplayer 5YySCg8K]