गावठाणातील रहिवाशांचा घरे देण्यास विरोध; पाचशेहून अधिक बांधकामधारकांच्या लेखी हरकती

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक, बेकायदा इमारती तसेच झोपडपट्टय़ांच्या समूह पुनर्विकासासाठी (क्लस्टर डेव्हलपमेंट) आखण्यात आलेल्या योजनेत सुरुवातीपासूनच अडचणी उद्भवू लागल्या आहेत. ‘झोपु’ योजनेतील झोपडय़ांचा या योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे संभ्रम वाढला असतानाच आता ठाण्यातील गावठाण भागातील बांधकामधारकांनी ही योजना राबवण्यास कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी पाचशेहून अधिक बांधकामधारकांनी महापालिका मुख्यालयात लेखी हरकती नोंदवून गावठाण परिसर क्लस्टर योजनेतून वगळण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडय़ा, बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी प्रशासनामार्फत समूह पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेतील तांत्रिक अडचणीचे मुद्दे काँग्रेस पक्षाने नुकतेच उपस्थित केले होते.  आता गावठाण आणि कोळीवाडा भागातील रहिवाशांनी या योजनेस कडाडून विरोध सुरू केला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर तयार करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ग्रामपंचायत काळातील घरे अधिकृत करण्याबाबतचे धोरण राबविण्यात आले नाही. त्यामुळे या बांधकामांना बेकायदा असा शिक्का बसला आहे. त्याचबरोबर कुटुंब सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक ग्रामस्थांनी या बांधकामांवर बेकायदा वाढीव मजले चढविले आहेत. बेकायदा ठरलेल्या या बांधकामांचा महापालिकेने समूह पुनर्विकास योजनेत समावेश केल्याने येथील नागरिकांनी विरोधाचा सूर लावला आहे. घोडबंदर भागातील कासारवडवली, मोघरपाडा, वाघबीळ, बाळकुम, कोलशेत, कोळीवाडा, भाईंदरपाडा आणि विटावा भागांतील पाचशेहून अधिक रहिवाशांनी गुरुवारी मुख्यालयात येऊन या योजनेस लेखी हरकती नोंदविल्या.

छोटय़ा घरांना विरोध

ठाणे महापालिका क्षेत्रातील गावठाण आणि कोळीवाडा भागात घराचे क्षेत्रफळ सरासरी एक हजार चौरस फुटापेक्षा जास्त आहे. या घरांचा समूह विकास योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना ३२२ चौरस फुटाचे घर मिळणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर अन्याय होण्याबरोबरच गावाची संस्कृतीही लोप पावणार आहे. त्यामुळे या योजनेस आमचा विरोध असून तशा स्वरूपाच्या पाचशेहून अधिक लेखी हरकती महापालिकेकडे नोंदविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

‘समूह विकास योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावठाण आणि कोळीवाडय़ाच्या मुद्दय़ावर काँग्रेस वगळता अन्य राजकीय पक्षांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. ही योजना केवळ बिल्डरांसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आले नाहीतर महापालिकेला घेराव घालण्यात येईल.’

– सागर पाटील, गावठाणातील रहिवासी