साहित्यिका प्रा. डॉ. सिसिलिया काव्र्हालो यांनी कवितासंग्रह, कथासंग्रह, चरित्रलेखन, बालवाङ्मय, ललित गद्यसंग्रह, आस्वादनपर लेखन, अनुवाद आदी विविध प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील तब्बल ३० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक महामंडळाच्या संपादक मंडळात त्या आहेत, त्याशिवाय जागतिक मराठी अकादमीच्या सदस्या आहेत. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन (नाशिक), गोमंतक महिला संमेलन (गोवा), मंथन साहित्य संमेलन (बेळगाव), राष्ट्रीय बंधुता संमेलन (पुणे) आदींच्या त्या अध्यक्षा होत्या. पुस्तकांवर त्यांचे अतिशय प्रेम आहे. लोक राहण्यासाठी घर विकत घेतात, परंतु त्यांनी पुस्तकांना ठेवण्यासाठी वसईत घर विकत घेतले आहे. प्रा. काव्र्हालो या वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यलयाच्या प्राचार्या आहेत.
प्रा. डॉ. सिसिलिया काव्र्हालो
आमच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक, कॅथोलिक पंथीय आणि शिस्तीचे होते. घरात बायबलशिवाय अन्य पुस्तके दर्शनी भागात नसत. माझे वडील आणि काका मराठी, इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांत शिकलेले असल्याने काही इंग्रजी पुस्तके, त्यातही बहुसंख्य धार्मिक स्वरूपाची पुस्तके घरात होती. वडील वर्तमानपत्र वाचत. त्यांचे इतिहासाचे वाचन चांगले होते. शालेय जीवनापासूनच ते आम्हाला इतिहासातील अनेक घटना प्रसंग वर्णन करून सांगत असत. शिवाय त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी अशा भाषा अवगत असल्याने भाषा साहित्याविषयी सांगत. त्यातून भाषा साहित्याविषयी कळत गेले.
शालेय जीवनात ग्रंथालयातून गोष्टींची पुस्तके, कथा-कांदबऱ्या वाचल्या होत्या. वर्तक महाविद्यलयात प्रवेश घेतल्यावर तेथील मराठी आणि इंग्रजी प्राध्यापक यात प्रा. प्रभाकर पाटील, प्रा. एकनाथ घाग, प्रा. व्हिंसेंट, प्राचार्य कोडोलीकर यांच्याकडून जे संदर्भ कळत गेले, त्यातून आणि तेथील ग्रंथालयातून वाचनासाठी पुस्तके मिळत गेली. मुंबई विद्यापीठात एमएला प्रवेश घेतल्यावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे मंदिरच झाले. साहित्य आणि त्याचे वाचन म्हणजे एक समुद्रच आहे. त्यात विहार करायला लागलो तर आयुष्य पुरणार नाही म्हणून मी माझी एक छोटीशी होडी घेऊन निघाले. माझ्या आवाक्यात येणारी पुस्तके मी वाचत होते म्हणून मी सुखरूपपणे किनाऱ्यावर येऊ शकले.
एकच कवी किंवा एकच लेखक आवडला असे झाले नाही. त्या लेखकाच्या शैलीनुसार, आशयानुसार लेखन आवडलेले आहे. लेखनातून मिळणारी जीवनमूल्ये मला महत्त्वाची वाटत होती. एखादे संपुर्ण आयुष्य समर्थपणे नजरेसमोर साकारण्याचे सामथ्र्य शब्दात असते..विचारात असते, हे कळत गेले. मराठी संतसाहित्य तसेच रा.भि. जोशी, सरोजिनी वैद्य, शंकर वैद्य, सुरेश भट, शिवाजी सावंत, उषा देशमुख, केशव मेश्राम या साहित्यिक, संशोधक, समीक्षक यांच्या भेटी आठवतात. त्यांच्या आशीर्वादाचा, शाबासकीचा हात माझ्यावर सतत राहिला आहे. या साहित्याच्या साहित्यातून कळले की, जे विचार सुचतात ते वाऱ्यावर सोडायचे नाहीत. ते शब्दांकित करायचे. ते आपल्याला समाजाकडून मिळालेले आहेत. तेच आपण समाजाला देत असतो.त्यामुळे आपण सततच विनम्र राहायला हवे. हीच भावना साहित्याच्या लेखनात आणि वाचनात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 12:56 am