ठाण्यात खेळाची मैदाने समारंभांना आंदण; महापालिकेचे नवे दरपत्रक ठाणे महापालिका क्षेत्रातील मैदाने खेळांसाठी खुली असावीत असा आग्रह सातत्याने धरला जात असला तरी महापालिका प्रशासन मात्र तिथे समारंभ, प्रदर्शने आयोजित करून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. नव्या वर्षांत या मैदानांत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शन तसेच कार्यक्रमांसाठी वाढीव भाडे आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या महासभेत तो मांडला जाणार आहे. प्रस्तावात धार्मिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी वेगवेगळे दर सुचविण्यात आले आहेत. या नव्या दरपत्रकानुसार धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी एक हजार रुपयांपासून १० हजार ५०० रुपयांपर्यंत अनामत रक्कम आणि ४८६ रुपयांपासून २४ हजार ३१० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे. मंडपाचा आकार ३००० चौरस फुटांपर्यंत असेल तर ६ हजार ३०० रुपये अनामत रक्कम आणि ३४० रुपये भाडे आकारले जाणार आहे. महापालिकेचे हे नियोजन पाहाता शहरातील मैदाने यंदाही वर्षांतून ठरावीक दिवस प्रदर्शन आणि कार्यक्रमांसाठी काबीज केली जातील, हे स्पष्ट आहे. कार्यक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाडय़ाचे दर २००३ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात आले होते. ते २०१४ पर्यंत कायम राहणार होते. मात्र, त्यानंतर भाडे दरात वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नावर परिणाम होत होता. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने २०१४ पासून प्रतिवर्षी पाच टक्के भाडेवाढ गृहीत धरून नवे दरपत्रक तयार केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मैदानांत होणाऱ्या कार्यक्रमांचा खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. २६ मैदानांचा समावेश ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण २६ मैदानांच्या भाडय़ाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नौपाडय़ातील गावदेवी मैदान, शिवाजी मैदान, कोपरीतील संत तुकाराम मैदान, कोपरी गावातील मैदान, उथळसरमधील कोलबाड, गोदूताई परुळेकर मैदान, कळव्यातील भारतमाता मैदान, पारसिक रेतीबंदर मैदान, विटावा मैदान, मुंब्य्रातील कौसा भागातील मैदान, माजिवाडा येथील भारतमाता मैदान तसेच कोलशेत, चितळसर मानपाडा, माजिवाडा, भाईंदरपाडा, कावेसर, सावरकरनगर (आई माता मंदिरासमोरील मैदान), नळपाडा, तुळशीधाम, गावंडबाग, उन्नती गार्डन मैदान, वागळे इस्टेटमधील संगीत भूषण पंडीत राम मराठे सांस्कृतिक कला-क्रीडा मंच आणि त्यासमोरील मैदानांचा समावेश आहे.