शेती ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. केवळ चैनीसाठी तिला कापू नका, तिला जगवा आणि स्वत:चा विकास करा. शासन तुम्हाला सवरेतोपरी सहकार्य करेल, या शब्दामध्ये ठाणे जिल्ह्य़ाचे कृषी अधीक्षक महावीर जेंगटे यांनी शेतजमीनीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न मुरबाड येथे केला. कल्याण तालुका शेतकरी सेवा संघ आणि गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मुरबाडचे आमदार किसन कथोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भविष्याचा विचार करून वर्तमानकाळात शेतकऱ्यांनी व्यवसायपूरक शेती करावी आणि आपला सातबारा आपल्याकडे कसा राहील याचे प्रयत्न कायम ठेवावेत. लग्न-हळदप्रसंगी होणारा वायफळ खर्च टाळून त्याचा वापर शेतीसाठी करावा, अन्यथा शेत जमिनीचे सातबारे निघून जातील. बांधावर उभे राहून शेती करण्यापेक्षा शेतात उतरा आणि भविष्य उज्ज्वल करा, असे आवाहन या वेळी आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना केले. या शेती मेळाव्यास कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी आपले गाऱ्हाणे शासनाच्या अधिकाऱ्यांकडे मांडले. शेतकऱ्यांनीही या वेळी आपल्या समस्या व तक्रारी लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतकरी संघाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी या वेळी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास नायब तहसीलदार अभिजित देशमुख, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण पाटील, उपसभापती दर्शना जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कपिल थळे, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, शेतीतज्ज्ञ, प्राचार्य डॉ. के. बी. कोरे उपस्थित होते.