28 January 2020

News Flash

‘नवा बालगंधार’द्वारे कवितांना संगीताचा साज

गवताचे पाते वाऱ्यावर डोलते..फुलपाखरू छान किती दिसते..खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी..

| July 14, 2015 05:07 am

गवताचे पाते वाऱ्यावर डोलते..फुलपाखरू छान किती दिसते..खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. इयत्ता पहिले ते दहावीच्या बालभारती पुस्तकातील कविता मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ठाण्यातील क्षितिजा वाळके या तरुणीने ‘नवा बालगंधार’ हा कार्यक्रम रंगमंचावर आणला आहे. शालेय कवितांना संगीत, नृत्य आणि निवेदनाची झालर चढवून हा कार्यक्रम अधिक रंगतदार केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गाणारी मुले मुंबई, नवी मुंबई, ठाणे, टिटवाळा या परिसरातील असून कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय ही मुले सगळ्या कविता सादर करून रसिकांची दाद मिळवीत आहेत.
कवितांना संगीत साज चढवून अशा अविस्मरणीय कविता रंगमंचावर सादर करण्यास शेखर लाड यांनी सुरुवात केली होती. मात्र हा कार्यक्रम काही वर्षांनी बंद पडला. या कार्यक्रमात निवेदन करणाऱ्या क्षितिजा वाळके या तरुणीने हा कार्यक्रम पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. तशी परवानगी शेखर लाड यांच्याकडून घेण्यात आली. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये या कार्यक्रमाची जमावजमव करण्यात आली. रत्नाकर पिळणकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या कविता या मुलांनी सादर करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०१४ रोजी या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम गडकरी रंगायतनमध्ये सादर करण्यात आला. कोणत्याही प्रकारचे प्रायोजकत्व न स्वीकारता क्षितिजा आणि तिचा भाऊ स्मित संसारे यानी हा कार्यक्रम यशस्वी केला. आता पुन्हा हा कार्यक्रम १९ जुलै रोजी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सकाळी अकरा वाजता सादर होणार आहे.

मराठी कविता मुलांनी विसरू नये शिवाय त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने हा नवा कार्यक्रम आम्ही रंगमंचावर घेऊन आलो आहोत. मराठी कवितांसाठी सध्याचा काळ अधिकच कठीण बनला असून त्यांचा प्रसार आत्ताच करणे गरजेचे आहे, असे वाळके यांनी सांगितले. कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

First Published on July 14, 2015 5:07 am

Web Title: promotion of marathi poems with supports of music
Next Stories
1 सण एकत्र साजरे करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
2 डोंबिवलीतील टपाल कार्यालयांची परवड
3 मनसेच्या मैत्रीसाठी रस्सीखेच
Just Now!
X