निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती

नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे माजी चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी कोटय़वधी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. शर्मा यांनी निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यासह पत्नीची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही कोटय़वधी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे, शर्मा यांच्या हातात फक्त ३७ हजार आणि पत्नीकडे दहा हजारांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

शर्मा यांनी नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती एक कोटी ८१ लाख ९१ हजार ४०८ रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यात बँक ठेवी आणि समभागांचा समावेश आहे.

शर्मा यांच्या नावे बँक खात्यातील ठेवी १६ लाख ४० हजार ६६८  तर पत्नीच्या नावे ७० लाख २६ हजार ७७७ रुपयांच्या ठेवी आहेत.

समभाग आणि म्युच्युअल फंड मिळून केलेली गुंतवणूक पाच लाख १६ हजार २७९  रुपयांची आहे. तर पत्नीच्या नावे २४ लाख १ हजार २४० रुपये एवढी गुंतवणूक आहे, तर पत्नीच्या नावे राष्ट्रीय बचत योजना, पोस्ट ऑफिस आणि आयुर्विमा कंपनीत १३ लाख ३४ हजार ४३१ रुपये आणि २५ लाख ८ हजार ९३३ रुपयांची गुंतवणूक आहे.

नालासोपारा येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रदीप शर्मा यांनी स्वत:कडील रोकड ३७ हजार ७११ आणि पत्नीकडे दहा हजार ३८३ रुपये इतकी दाखविली आहे.