लक्षणे नसतानाही रुग्णांना दाखल केल्याने पालिकेकडून दंडात्मक कारवाईसाठी नोटीस

ठाणे : करोनाबाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून अवाच्या सवा बिलांची आकारणी केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दोन खासगी रुग्णालयांवर कारवाई केली आहे. यापैकी एका रुग्णालयाला तीन लाखांच्या तर दुसऱ्या रुग्णालयाला १३ लाखांच्या दंडाची नोटीस प्रशासनाने पाठवली आहे. दरम्यान, सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाही तर मालमत्ता करवसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रकमेच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे हत्यार उपसण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली असून ही रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असे असले तरी शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्या तुलनेत ही रुग्णालये अपुरी पडत आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसतील किंवा रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर त्यांना कोविड काळजी केंद्र किंवा घरीच उपचार करणे अपेक्षित आहे. अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले तर आवश्यक असलेल्या रुग्णांना उपचारासाठी जागा मिळणार नाही.

त्यामुळेच राज्य शासनाकडूनही तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही ठाण्यातील दोन खासगी रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या आणि त्रासही जाणवत नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले होते. महापालिका प्रशासनाकडून दररोज शहरातील रुग्णालयातील शिल्लक जागांचा आढावा घेतला जात असून या आढाव्यादरम्यान ही बाब समोर आली. त्यानुसार या

दोन्ही खासगी रुग्णालयांना महापालिका प्रशासनाने चार दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. मात्र, दोन्ही रुग्णालयांकडून नोटिशीला स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे या नोटिशीचा कालावधी संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन्ही रुग्णालयांना मिळून १६ लाखांचा दंड आकारण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीची नोटीस बजावली.

तीन रुग्णांना सात दिवस दाखल करून ठेवल्याप्रकरणी एका रुग्णालयाला तीन लाख तर १३ रुग्णांना ७ दिवस रुग्णालयात दाखल करून ठेवल्याप्रकरणी १३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाही तर मालमत्ता करवसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रकमेची वसुली करण्यात येणार आहे.

-विश्वनाथ केळकर, उपायुक्त, ठाणे महापालिका