01 October 2020

News Flash

ठाणेपल्याड घरांचे दर चढेच!

ठाकुर्ली आणि दिवा जंक्शन होणार असल्याने याचाही फायदा व्यावसायिकांनी घेतला आहे.

कल्याणपुढील परिसरातील घरांच्या किमतीही गतवर्षीच्या तुलनेत कमी न झाल्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे

कल्याण पट्टय़ातील गृहदरांवर नोटाबंदीचा परिणाम नाही;  मेट्रोच्या केवळ चर्चेनेच मालमत्तांना भाव

गेल्या वर्षीच्या निश्चलनीकरणानंतर घरांचे दर स्वस्त होतील, या आशेवर असणाऱ्या सर्वसामान्यांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील घरांच्या वाढीव किमतीने निराश केले असतानाच, कल्याणपुढील परिसरातील घरांच्या किमतीही गतवर्षीच्या तुलनेत कमी न झाल्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या परिसरातील ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांसाठी ३२ ते ४५ लाख रुपयेच मोजावे लागणार असल्याचे गुरुवारी कल्याणमध्ये भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनातून दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागातील घरांच्या किमतींमध्ये फार वाढ झाली नसली तरी त्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी नसल्याचे येथील विकासकांचे म्हणणे आहे.

नोटाबंदीमुळे गृहनिर्माण क्षेत्रात मंदी येऊन घरांच्या किमती कमी येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता; परंतु ठाणे शहरात नुकत्याच भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनाने तो खोटा ठरवला. आता ठाणेपल्याड अर्थात कल्याण ते बदलापूर पट्टय़ातील घरांच्या किमतींवरही निश्चलनीकरणाचा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात ‘एमसीएचआय केड्राई’च्या कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात शंभरहून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत; परंतु या सर्व स्टॉल्सवर कल्याणपुढील ४५० चौरस फुटांच्या घरासाठी ३० ते ६० लाख रुपये किमती ठरवण्यात आल्या आहेत, तर ६०० ते ७५० चौरस फुटांच्या घरांच्या किमती विभागानुसार ४५ ते ९० लाखांच्या घरात आहेत. डोंबिवली परिसरातील घरांचे दर तर यापेक्षाही अधिक आहेत.

बिल्डरांवरही मर्यादा

नोटाबंदीमुळे सुरुवातीच्या काळात घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला असला तरी यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे, अशी प्रतिक्रिया शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. मुळातच बिल्डरांनी अवाच्या सवा दराने जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्याचा मर्यादा आहेत. त्यामुळे रोकड रकमेसह घर खरेदी करू पाहाणाऱ्यांसाठी  सवलती पुढे केल्या जात असल्या तरी पूर्वीपेक्षा घरे स्वस्त होण्याची शक्यता नाही, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.

ठाकुर्ली, दिव्याची चलती

ठाकुर्ली आणि दिवा जंक्शन होणार असल्याने याचाही फायदा व्यावसायिकांनी घेतला आहे. शहरापासून प्रकल्प दूर असला तरी तुम्हाला या ठिकाणी मोठे आणि प्रशस्त अशा गृहसंकुलात घर घेता येणार आहे. या भागातील घरांच्या किमतीही ४० लाखांच्या पुढेच आहेत. ठाकुर्ली, दिव्याचे जंक्शन आणि भविष्यातील कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या नावाने चांगभलं करून घेण्यास बिल्डरांनी सुरुवात केली आहे. राज्य सरकारने ठाणे- कल्याण- भिवंडी मेट्रो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच मार्गाला जोडून कल्याणमधील नागरिकांचीही सोय व्हावी म्हणून ही मेट्रो दुर्गाडी, सहजानंद चौक येथून तसेच तळोजा मेट्रो मार्गही या मार्गाला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले. घरांच्या किमती चढय़ा ठेवण्यासाठी ही घोषणाच पुरे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2017 3:08 am

Web Title: property rate high in kalyan region despite demonetization
Next Stories
1 कल्याणात वाळूमाफियांचा ‘किल्ला’ उद्ध्वस्त
2 पाण्याच्या शोधात माकडे शहरात
3 कोपऱ्याच्या वाडीला ‘साकव’चा आधार
Just Now!
X