दीडशे घर खरेदी-विक्रीदारांना ताटकळल्याने मनस्ताप

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील गांधीनगरमधील तर्टे प्लाझा संकुलातील दस्त नोंदणीकरण कार्यालयाला भारत सेवा संचार निगमकडून होणाऱ्या इंटरनेट  सेवेत बुधवारी दुपारी दोन वाजता तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे दस्त नोंदणीकरणाचे काम बंद पडले. नोंदणीकरण अधिकाऱ्यांनी ‘बीएसएनएल’ अधिकाऱ्यांना संपर्क करूनही संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत सेवा पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे पाच तास रांगेत ताटकळत असलेल्या रहिवाशांना अधिकाऱ्यांनी घरी जाण्यास सांगितले.

३१ डिसेंबपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार केले तर त्या व्यवहारांवर शासनाकडून मुद्रांक शुल्कमध्ये सुट असल्याने मागील काही महिन्यांपासून खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा वेग वाढला आहे. बुधवारी वर्ष संपण्यापूर्वीच आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेक मालमत्ता, सदनिका खरेदीदार-विक्री करणारे रहिवाशी सकाळी सहा वाजल्यापासून डोंबिवलीतील गांधीनगरमधील दस्तनोंदणी कार्यालयात हजर होते. दुपारी दीड वाजेपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. दुपारी दोन वाजता ‘बीएसएनएल’कडून दस्त नोंदणी कार्यालयाला होणाऱ्या सेवेत तांत्रिक अडथळे येऊन दस्तनोंदणी बंद पडली. अर्धा-एक तासात ही सेवा पूर्ववत होईल म्हणून रहिवासी कार्यालयात बसून राहिले. नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ बीएसएनएल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. बीएसएनएल अधिकाऱ्यांनी संध्याकाळी कार्यालयीन वेळेपर्यंत तांत्रिक दोष शोधण्याचा प्रयत्न केला पण तो दोष सापडला नाही. त्यामुळे नोंदणीकरण रखडले. अनेक रहिवाशांनी स्वत: नांदिवली, टिळकनगर, एमआयडीसी बीएसएनएल कार्यालयात जाऊन सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. ठाणे, कल्याणमधील दस्तनोंदणी सुरू असताना डोंबिवलीतील दस्त नोंदणी बंद पडल्याने ठाण्याच्या वरिष्ठ दुय्यम निबंधकांनी बीएसएनएलच्या वरिष्ठांना संपर्क केला. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी आम्ही दोष शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उत्तर दिले.

डोंबिवलीत गांधीनगर, मानपाडा भागात गटारे, रस्ते गटारांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी जेसीबीने खोदकाम करण्यात आले आहे. या खोदाईत बीएसएनएलच्या वाहिनीला फटका बसून ती तुटली असण्याचा अंदाज नोंदणीकरण अधिकाऱ्यांनी वर्तविला. दुपारी दोनपासून ताटकळत असलेले ग्राहक संध्याकाळी सात वाजेपर्यंत रांगेत होते. नोंदणीकरण अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिलासा देऊन सेवा सुरू झाली तर उपस्थित सर्व रहिवाशांचे दस्तनोंदणी पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. संध्याकाळी साडे सात वाजता निगमची सेवा सुरू होत नाही दिसल्यावर दस्त नोंदणीकरण अधिकाऱ्यांनी साडे सात वाजता दुपारपासून ताटकळत असलेल्या १५० रहिवाशांना घरी जाण्यास सांगितले. सेवा पूर्ववत झाली तर गुरुवारी राहिलेल्या रहिवाशांची दस्त नोंदणी प्राधान्याने पूर्ण करून देण्याचे आश्वासन गांधीनगर तर्टे प्लाझामधील अधिकाऱ्यांनी दिले.

अनेक रहिवाशांनी घर खरेदी-विक्री नक्की केल्याने त्यांचे दस्त नोंदणीकरण करण्यासाठी बुधवारी दुपारपासून टोकन मिळाल्याप्रमाणे रांगेत होतो. दुपारी दोन वाजता बीएसएनएलची नोंदणीकरण कार्यालयाला होणारी सेवा बंद पडली. नोंदणीकरण ठप्प झाले. संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत सुमारे १५० ग्राहक कार्यालयाबाहेर होते. सेवा पूर्ववत न झाल्याने अखेर साडे सात वाजता तेथून सगळ्यांनी काढता पाय घेतला.

शैलेश चितोडकर, विकासक

कल्याण परिसरातील सर्व नोंदणीकरण कार्यालये सुरळीत सुरू आहेत. फक्त गांधीनगर कार्यालयाला बीएसएनएलकडून होणारी सेवा खंडित झाली. ती पूर्ववत करावी म्हणून बीएसएनएलच्या वरिष्ठांना कळविले आहे. ते अधिकारीही सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यालय परिसरातील रस्ते खोदाईची कामे झाली आहेत. त्यामुळे वाहिनीला फटका बसून ती बंद पडली असावी.

तानाजी गंगावणे, दुय्यम निबंधक, ठाणे