झोपडपट्टीतील घरांची कर पावती इतरांच्या नावे प्रस्तावानुसार हस्तांतरण करणे शक्य

भाईंदर : येत्या २०२०-२१  मीरा -भाईंदर महानगरपालिका अर्थसंकल्पात मालमत्ता हस्तांतर शुल्कात  वाढ करण्याचा प्रस्ताव  कर निर्धारक विभागाकडून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना  ३१ मार्चनंतर  मीरा-भाईंदरमध्ये मालमत्ता हस्तांतर करणे अधिक खर्चाचे होणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील घरांची कर पावती इतरांच्या नावे हस्तांतरण होत नव्हती ती देखील नवीन  प्रस्तावानुसार हस्तांतरण करता येणार आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मालमत्ता असल्यास  त्यांनी मालमत्ता कर पावती लवकर हस्तांतरण करणे आवश्यक आहे. ३१ मार्चनंतर हस्तांतरण शुल्कामध्ये  मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. आता नागरिकांसाठी  १ हजार रुपये व दुकानासाठी पंधराशे रुपये शुल्क  आकारले  जाते. यामध्ये मालमत्तेची किंमत कितीही असली तरी एक समान  शुल्क आकारले  जात होते.  परंतु आता घर किंवा दुकानाच्या किमतीनुसार हस्तांतरण फी आकारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.रहिवासी मालमत्ता कर पावती हस्तांतरणासाठी चार हजार  ते दहा हजार रुपया पर्यंत आणि व्यवसाय मालमत्ता कर पावती हस्तांतरण करण्यासाठी दहा हजार ते बारा हजार रुपये शुल्क  आकारण्यात येणार आहे.

तर झोपडपट्टीतील मलमत्ता कर पावती इतरांच्या नावे हस्तांतरित करण्यात येत नव्हती ती आता नवीन प्रस्तावानुसार ज्या झोपडय़ाचा रहिवासासाठी वापर करण्यात येत आहे त्यांना चार हजार रुपये व ज्यांचा दुकानासाठी वापर करण्यात येत आहे त्यांच्याकडून सहा हजार रुपये फी आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील नागरिकांची कर पावती हस्तांतरण करण्याची मागणी होत होती ती आता पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पारित झाला तर पालिकेच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. या प्रस्तावानुसार कर पावती मध्ये पहिले नाव जमीन मालकाचे व दुसरे नाव भोगवटादाराचे नाव येणार आहे.कर पावती वर नाव आल्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना वीज , पाणी कनेक्शन व इतर सुविधांसाठी या योजनेचा फायदा होणार आहे.