वसई-विरार महापालिकेची योजना; युरोनेट कंपनीबरोबर करार

वसई-विरारमधील रहिवाशांना आता पेटीएम, मोबिक्विकसारख्या मोबाइल वॉलेट आणि कोणत्याही एटीएम केंद्रात जाऊन मालमत्ता कर भरता येणार आहे. रहिवाशांना कर भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महापालिकेने युरोनेट या कंपनीबरोबर करार केला आहे.

रहिवाशांकडून कररूपाने मिळणारे उत्पन्न पालिकेच्या प्रमुख उत्पन्नापैकी एक आहे. रहिवाशांनी अधिकाधिक संख्येने कर भरावा यासाठी पालिका प्रयत्नशील असते. पालिकेच्या मुख्यालयाबरोबर सर्व विभागीय कार्यालयात रोखीने कर स्वीकारले जात आहेत. मात्र करभरणा रोकडरहित व्हावा यासाठी महापालिकेने त्यांच्या संकेतस्थळावरून भरण्याची सुविधा सुरू केली होती. आता एक पाऊल पुढे टाकत महापालिकेने मोबाइल वॉलेट आणि एटीएम केंद्र, तसेच रिचार्ज सुविधांमार्फत रहिवाशांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी युरोनेट या कंपनीबरोबर करार केला आहे.

स्मार्टफोनमध्ये पेटीएम, मोबिक्विक, फ्री चार्ज आदी विविध मोबाइल वॉलेट असतात. त्याद्वारे ग्राहक वीज, मोबाइल, डीटीएच आदी बिले भरतात. पालिकेने युरोनेट कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार या सर्व अ‍ॅप्सद्वारे मालमत्ता आणि पाणीकर भरता येणार आहे. या प्रत्येक मोबाइल वॉलेटमध्ये पालिकेच्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा असेल. यासाठी नागरिकांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय एटीएम केंद्रातही त्याच यंत्रावर पालिकेचा मालमत्ता कर भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

हे सर्व रोकडरहित व्यवहाराचे प्रकार आहेत. ज्यांना हे जमत नसेल त्यांच्यासाठी रिचार्जचीही सुविधा आहे. त्यासाठी फ्रीचार्जच्या ऑक्सिजन कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही दुकानात जाऊन मोबाइवर रिचार्ज करतो, त्याप्रमाणे मोबाइल रिचार्ज करून देणाऱ्या दुकानातून मालमत्ता कर रिचार्जसारखा भरता येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

संकेतस्थळावरून दीड कोटींचा कर जमा

पालिकेच्या संकेतस्थळावरून कर भरण्याचे प्रमाण वाढत आहे. चालू आर्थिक वर्षांत १ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. ३ हजार ४६६ जणांनी ऑनलाइन मालमत्ता कर भरला आहे, तर ८०० जणांनी १९ लाख ५३ हजार रुपयांचा पाणी कर ऑनलाइन भरला आहे.