विरोधी पक्षनेत्यांनाही नवी गाडी; प्रस्तावाला विरोध करणारे भाजप नगरसेवक मात्र गैरहजर

ठाणे : करोना संकटामुळे उत्पन्नात घट झाल्याने पुढील आर्थिक वर्षासाठी काटकसरीचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला असला तरी, दुसरीकडे मात्र सत्ताधारी शिवसेनेने मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना नव्या वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून हौस भागवून घेतली. या प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्याच्या तयारीत असलेले विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनाही शिवसेनेने नवे वाहन देण्याची सूचना करत शांत केल्याने त्यांनीही चुपी साधली. तर, गेल्या दोन दिवसांपासून या प्रस्तावाला कडाडून विरोध करणारे भाजपचे नगरसेवक मात्र सभेला गैरहजर होते. त्यामुळे कोणत्याही विरोधाविनाच हा प्रस्ताव मार्गी लागला असून त्यात आता विरोधी पक्ष नेत्यांच्या वाहनाच्या खर्चाची भर पडली आहे.

करोना संकटाच्या काळात महापालिकेला विविध करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी तूट आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पुढील वर्षासाठी काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही पालिका पदाधिकाऱ्यांनी मात्र नवी वाहनांची मागणी केली होती. त्याआधारे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यासाठी एकूण ७ नवीन वाहने खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली होती. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही चर्चेविनाच हा प्रस्ताव मंजूर झाला.

विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी या प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्यास सुरुवात केली असता शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी प्रस्तावामध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या वाहनाचाही समावेश करण्याची सूचना केली. अशाप्रकारे सत्ताधारी शिवसेनेने विरोधी पक्ष नेते पठाण यांनाही शांत केले आणि त्यानंतर त्यांनीही प्रस्तावाबाबत मौन धारण केले. या प्रस्तावाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांच्या मिलीजुली सरकारचे चित्र पुन्हा दिसून आले.

भाजपच्या नगरसेवकांची अनुपस्थिती

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी नवे वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. तसेच या प्रस्तावास विरोध करत तो रद्द करण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत भाजपचे नगरसेवक या प्रस्तावास विरोध करतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र या सभेला भाजपच्या काही नगरसेवकांनी उपस्थिती लावली. मात्र, काही क्षणातच ते सभेतून निघून गेले. त्यामुळे नव्या वाहन खरेदीचा प्रस्ताव चर्चेसाठी आला, त्यावेळेस भाजपचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. सभागृहाबाहेर भाजपने प्रस्तावाविरोधी भूमिका घेतली असतानाही सभागृहात मात्र प्रस्तावाला विरोध करण्यासाठी एक नगरसेवक उपस्थित राहिला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.