‘करोना’च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना पाणीवापरावर आगामी वर्षांत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असून यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात खंडित झालेली सर्वसाधारण सभा येत्या आठवडय़ात घेण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यातील खंडित आणि मार्च महिन्यातील नवीन सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणीवापराच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, वेळेअभावी ही सभा खंडित करण्यात आली होती. असे असतानाच ठाणे महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी गेल्या आठवडय़ात सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीवापराच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते

फेब्रुवारी महिन्यात खंडित झालेली सर्वसाधारण सभा येत्या आठवडय़ात घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले जात होते. तर मार्च महिन्याची नवीन सर्वसाधारण सभा २० मार्च रोजी आयोजित केली होती; परंतु ‘करोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्वच कार्यक्रम रद्द केले असून त्याचबरोबर २० मार्च रोजी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा रद्द करून ती पुढे ढकलली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात खंडित झालेली सर्वसाधारण सभा येत्या आठवडय़ात घेण्याची तारीख निश्चित केली नसली तरी ही सभाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यातील पाणी दरवाढ लांबणीवर गेल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांनी सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.