गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकरांना दाखविण्यात आलेल्या वनस्पती उद्यानच्या स्वप्नावर अखेर पाणी सोडण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना भाजप गटनेत्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून कात्रप येथील ५५ एकर जागेवर वनस्पती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव होता. हे गार्डन कसे असेल, त्यात कोणकोणत्या झाडांचा समावेश असेल, पर्यटकांसाठी उद्यानात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशा अनेक बाबींवर गेल्या काही काळात चर्चा रंगल्या. या गार्डनमुळे बदलापूरच्या पर्यटन व्यवसायातही वाढ होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने तेथे हे उद्यान उभारणे शक्य होणार नाही, याविषयी सभागृहाचे एकमत झाले. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आरक्षण वगळता कोणतेही आरक्षण बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे आता क्रीडांगणाचाच विकास केला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शहरात असे बोटॅनिकल उद्यान असावे असा प्रस्ताव तत्कालिन नगराध्यक्ष राम पातकर यांनी मोठा गाजावाजा करत त्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. मंगळवारच्या सभेत भाजप गटनेत्यांनीच हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना केली.

बदलापूरकरांना स्टेडियम मिळणार
वनस्पती उद्यानचा प्रस्ताव जरी रद्द झाला असला तरी बदलापूर शहराला एक प्रशस्त स्टेडियम मिळणार हे मात्र नक्की झाले आहे. गेल्याच महिन्यात क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी तुम्ही मला जागा द्या, मी तिथे स्टेडियम बांधतो, असे आश्वासन नगराध्यक्षांसमोर दिले होते. त्यामुळे आता शहरात स्टेडियमचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात ५५ एकर जमिनीवर उभे राहणारे हे स्टेडियम वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील बालेवाडी स्टेडियमपेक्षा मोठे ठरू शकते.